रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बाभळगावच्या शेतात घेतलं ब्रोकोलीचं पीक, सुनेकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:01 IST2026-01-06T14:00:49+5:302026-01-06T14:01:22+5:30
सासूबाईंच्या शेतातील 'ब्रोकोली' पाहून दीपशिखा देशमुख खुश! व्हिडीओ पाहून शिल्पा शेट्टीनं केली 'ही' मागणी

रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बाभळगावच्या शेतात घेतलं ब्रोकोलीचं पीक, सुनेकडून कौतुक
अभिनेता रितेश देशमुख लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग बराच मोठा असल्याचे दिसून येते. रितेश देशमुख आणि त्याचे कुटुंब हे बरेचदा चर्चेत असते. रितेशचे वडिल दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांची दोन मुलं राजकारणात सक्रिय आहेत. रितेशच्या आईसाहेब आणि विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख या बाभळगावच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. आता देखील त्यांनी ब्रोकोलीचं पीक घेतलंय.
देशमुख कुटुंबाची सून आणि धीरज विलासराव देशमुख यांच्या पत्नी असलेल्या दीपशिखा देशमुख यांनी इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्या सासुबाईंच कौतुक करत म्हणाल्या, "आमच्या आईच्या शेतातील ब्रोकोली... या किती किती सुंदर आहेत. खरंच माझ्या सासूबाई रॉकस्टार आहेत. माझ्या सासूबाई या ब्रोकोलींचे फोटो आम्हाला पाठवायच्या आणि आज आम्ही रात्री जेवताना ही ब्रोकोली बनवणार आहोत. थँक्यू आई, खूप खूप प्रेम", असं म्हटलं.
दीपशिखा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन देत लिहलं, "जेव्हा सासू स्वतःच्या शेतात ब्रोकली पिकवते आणि त्याचा तुम्हाला इतका जास्त आनंद होतो. सेंद्रिय, ताजी आणि प्रेमाने घरच्या शेतात पिकवलेली ब्रोकोली". या व्हिडीओवर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने "तू एकटी किती खाणार, मलाही पाठवून दे" अशी मजेशीर कमेंट केली आहे.
दरम्यान, दीपशिखा व धीरज देशमुख यांचा विवाहसोहळा २०१२ मध्ये थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला बरेच मान्यवर उपस्थित होते. दीपशिखा व धिरज यांना वंश देशमुख व दिवीयाना देशमुख अशी दोन मुलं आहेत. दीपशिखा या बॉलिवूडमध्ये काम करतात. बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीची त्या बहीण आहेत.