झोपण्यापूर्वी रोज बायकोच्या पाया पडतो रवी किशन; अजय देवगणने घेतली फिरकी, म्हणाला- "जो जास्त.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:57 IST2025-07-17T16:55:21+5:302025-07-17T16:57:45+5:30
रोज रात्री झोपण्याआधी रवी किशन पत्नीच्या पाया पडतो हे ऐकताच अजय देवगणने दिलेल्या उत्तराने सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली. काय म्हणाला अजय?

झोपण्यापूर्वी रोज बायकोच्या पाया पडतो रवी किशन; अजय देवगणने घेतली फिरकी, म्हणाला- "जो जास्त.."
नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता आणि खासदार रवी किशनने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेलं एक विधान विशेष लक्ष वेधून घेत आहे. शोदरम्यान असं समजतंय की, रवी किशन रोज रात्री झोपण्यापूर्वी पत्नीला नमस्कार करतो. हे ऐकून स्टुडिओमधील सगळेच थोडे वेळासाठी शांत झाले. त्यांनी रवीचं कौतुक केलं. पण अजय देवगणच्या उत्तराने लगेच हशा पिकला. असं काय म्हणाला अजय?
अजय देवगणच्या एका वाक्याने सर्वांची बोलती बंद
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कपिल शर्माने रवी किशनविषयी खुलासा केला की, रवी रोज रात्री झोपताना पत्नीच्या पाया पडतो. हे ऐकताच अभिनेता अजय देवगणने रवीची चांगलीच फिरकी घेतली. अजय हसत हसत म्हणाला की, "जो व्यक्ती जितका दोषी असेल ना तो तितका पत्नीच्या पाया पडत असतो." अजयच्या या वक्तव्यावर सगळेच खळखळून हसले. खुद्द रवी किशनही खुर्चीतून उडी मारून हसत सुटला. अजयच्या एका उत्तराने शोचा संपूर्ण मूडच बदलला.
कधी बघायला मिळेल एपिसोड?
हा प्रोमो सध्या नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून प्रेक्षकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रवी किशनच्या पत्नीसाठी असलेल्या आदरभावनेचं कौतुक केलं आहे, तर काहींनी अजय देवगणच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा हा भाग १९ जुलै रोजी रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कपिल शर्माच्या सूत्रसंचालनाखालील या शोमध्ये दर आठवड्याला बॉलिवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती असते. या आठवड्यात 'सन ऑफ सरदार २'ची टीम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.