राशा थडानीला लागली लॉटरी, महेश बाबूच्या पुतण्यासोबत करणार रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:13 IST2025-11-18T13:13:09+5:302025-11-18T13:13:47+5:30
Rasha Thadani : रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने 'आझाद' चित्रपटातून पदार्पण केले आणि आता तिला एक तेलुगू चित्रपट मिळाला आहे. महेश बाबूचा पुतण्या जय कृष्णा घट्टामनेनी याच्यासोबत तिला कास्ट करण्यात आले आहे. राशाने स्वतःचे पोस्टर देखील शेअर केले आहे, जे पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राशा थडानीला लागली लॉटरी, महेश बाबूच्या पुतण्यासोबत करणार रोमान्स
या वर्षाच्या सुरुवातीला, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी हिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला प्रवास सुरू केला. तिने अभिषेक कपूरच्या 'आझाद' चित्रपटातून अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगणसोबत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिच्या मनमोहक हावभाव, प्रभावी संवादफेक आणि 'उई अम्मा' गाण्यावरील तिच्या मोहक शैलीमुळे राशा लवकरच सेंसेशन बनली. नुकतीच ती 'मुंज्या' फेम अभय वर्मासोबत त्याचा आगामी चित्रपट 'लइकी लइका'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान आता नुकतेच राशाने तिच्या तेलुगू पदार्पणाची घोषणा केली आहे, ज्यात ती सुपरस्टार महेश बाबूचा पुतण्या जय कृष्णा घट्टामनेनी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
राशा थडानीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या पहिल्या तेलुगू चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्याचे शीर्षक सध्या #AB4 असे ठेवण्यात आले आहे. ती चित्रपट निर्माता अजय भूपती यांच्यासोबत काम करणार आहे, ज्यांनी RX 100चे दिग्दर्शन देखील केले होते. हा चित्रपट महेश बाबूचा पुतण्या जय कृष्णा घट्टामनेनी याच्यासोबत असेल. जय कृष्णा हे दिवंगत अभिनेता रमेश बाबू यांचे पुत्र आणि दिग्गज अभिनेते कृष्णा यांचा नातू आहे.
राशा थडानीची साउथ सिनेइंडस्ट्रीत एंट्री
राशाने ही बातमी शेअर करत लिहिले की, "नवी सुरुवात, कृतज्ञता! 'मी अंदरि प्रेमा थो' (तुमच्या सर्वांच्या प्रेमाने), मी तेलुगू सिनेमात पाऊल ठेवत आहे. या संधीसाठी अजय भूपती सर यांचे धन्यवाद. हा प्रवास सुरू करण्यासाठी खूप उत्साही आहे! #AB4 #TeluguDebut. अश्विनी दत्तद्वारे सादर जेमिनी किरण यांनी निर्मित, @ckpicturesoffl बॅनर अंतर्गत. वैजंयती मुव्ही, स्वप्न सिनेमा, आनंदी आर्ट क्रिएशन्स."
राशा थडानीचा लूक
पहिल्या लूकच्या पोस्टरमध्ये राशा एका काळ्या बाईकला टेकून उभी आहे. तिने काळ्या रंगाचा टँक टॉप आणि निळी जीन्स परिधान केली असून ती खूप सुंदर दिसत आहे. तिचे स्वागत करताना, अजय भूपति यांनी लिहिले, "सुंदर आणि प्रतिभावान राशा थडानीचे तेलुगू सिनेमात स्वागत आहे. #AB4 मध्ये तिची स्क्रीन प्रेझेंस पाहण्यासाठी तयार रहा."
चाहते झाले आनंदी
राशाने ही बातमी शेअर करताच अनेक चाहत्यांनी तिला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला. अशाच एका इंटरनेट युजरने राशाला 'पॅन इंडिया सुपरस्टार राशा थडानी' म्हटले, तर एकाने कमेंटमध्ये लिहिले की, ओएमजीजी!! हे खूप खतरनाक आहे. एका चाहत्याने म्हटले, राशू आम्हाला चकित करण्यात कधीच कमी पडत नाही!! तर एका युजरने लिहिले, तेलुगू पदार्पणासाठी शुभेच्छा.