फक्त आणि फक्त धोनीसाठी रणवीर सिंगने स्वीकारले होते ते काम...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 18:01 IST2020-08-16T17:49:56+5:302020-08-16T18:01:36+5:30
माहीसाठी रणवीरने लिहिली खास पोस्ट...

फक्त आणि फक्त धोनीसाठी रणवीर सिंगने स्वीकारले होते ते काम...!
माही अर्थात तुमचा आमचा लाडका महेंद्र सिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती अनेकांना भावूक करून गेली. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हाही त्यापैकीच एक़ रणवीर माहीसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. सोबत माहीसोबतचा एक थ्रोबॅक फोटोही पोस्ट केला आहे. हा फोटो माझ्या अनमोल संपत्तीपैकी एक आहे, असे रणवीरने लिहिले आहे.
पोस्ट मध्ये रणवीर लिहितो...
‘हा फोटो माझ्या अनमोल संपत्तीपैकी एक आहे. 2007/2008 च्या दरम्यान कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये घेतलेला हा फोटो. तेव्हा मी22 वर्षांचा होतो, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम का केले तर फक्त आणि फक्त धोनीसाठी. त्या जाहिरातीत एमएस धोनी काम करणार होता, म्हणून मी हे काम स्वीकारले. मी ओव्हरवर्क आणि अंडरपेड होतो. म्हणजे, माझ्याकडून खूप काम करून घेतले गेले आणि मला त्याचे पैसेही दिले गेलेत नाही. पण मला त्याची पर्वा नव्हती. मला फक्त धोनीसोबत राहायचे होते. त्यावेळी काम करताना मला इजा सुद्धा झाली होती, पण मी तरीही काम करत राहिलो. माझ्या या प्रामाणिक कामाच्या मोबदल्यात मला धोनीला भेटायची संधी मिळेल आणि कदाचित त्याच्यासोबत एक फोटोही मिळेल, हीच एकमेव आस होती. अखेर मी त्याला पहिल्यांदा भेटलो. ती भेट हैराण करणारी होती. तो अत्यंत विनम्र, गर्व नसलेला, प्रत्येकाशी आपुलकीने बोलणारा आणि प्रेमळ होता...’
सांगितला दुस-या भेटीचाही किस्सा...
धोनीसोबत माझी दुसरी भेट ‘बँड बाजा बारात’ रिलीजनंतर झाली होती. हेअर स्टाइलिस्ट सपना भवनानीने आमची भेट घालून दिली होती. पहिला सिनेमा केल्यानंतर एकदिवस मला सपनाचा फोन आला. तू धोनीचा खूप मोठा फॅन आहेस, मला ठाऊक आहे. तो मेहबूब स्टुडिओत शूटींग करतोय. ये आणि त्याला भेट अशी ती मला म्हणाली आणि मी अक्षरश: धोनीला भेटायला पळत सुटलो होतो. मी कॅप आणि जर्सीवर धोनीचा आॅटोग्राफ घेतला होता. जणू मी हवेत उडत होतो..., असे रणवीरने लिहिले.