दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमाबाबत मोठा निर्णय, म्हणाला- "सिनेमाचा ट्रेलर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:21 IST2025-11-12T10:21:04+5:302025-11-12T10:21:30+5:30
दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगने त्याच्या आगामी सिनेमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमाबाबत मोठा निर्णय, म्हणाला- "सिनेमाचा ट्रेलर..."
दिल्लीतील भयानक स्फोटानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. ज्यामध्ये ९-१० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील स्फोटानंतर रणवीर सिंगने त्याच्या आगामी सिनेमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
रणवीर सिंगचा 'धुरंधर' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज म्हणजेच १२ नोव्हेंबरला प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, दिल्लीतील घटनेनंतर 'धुरंधर'चा ट्रेलर आज प्रदर्शित न करण्याचा निर्णय टीमकडून घेण्यात आला आहे. 'धुरंधर' सिनेमाच्या ट्रेलरचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. रणवीर सिंगने याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. "'धुरंधर' ट्रेलर लाँच १२ नोव्हेंबरला होणार होतं जे पुढे ढकलण्यात आलं आहे. दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या प्रती आदराची भावना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शनाची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येईल", असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
दिल्लीतील भयंकर घटनेनंतर रणवीर सिंगलाही मोठा धक्का बसला आहे. याबाबत त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. "दिल्लीतील घटनेने मी हादरून गेलो आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात मी सहभागी आहे", असं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 'धुरंधर' ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या सिनेमातील संजय दत्त, आर माधवन आणि अर्जुन रामपालचा लूक समोर आला आहे.