नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:10 IST2025-07-09T14:10:11+5:302025-07-09T14:10:56+5:30
'रामायण' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असून तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती फी घेतली हे माहित आहे का?

नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं
नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकतंच 'रामायण'ची पहिली झलक समोर आली आहे. सिनेमाचा टीझर अलिकडेच प्रदर्शित झाला. टीझरनंतप सिनेमाबाबतची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. याआधीच 'रामायण' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असून तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती फी घेतली हे माहित आहे का?
'रामायण' हा बिग बजेट सिनेमा दोन भागांमध्ये बनणार आहे. यासाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचं बजेट असल्याचं सांगण्यात येत आहे. २०२६ मध्ये 'रामायण'चा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रामायण' सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो समोर आले होते. त्यात रणबीर रामाच्या लूकमध्ये दिसत होता. तर टीझरमध्येही रणबीरची रामाच्या रुपातली छोटीशी झलकही पाहायला मिळाली. या भूमिकेसाठी रणबीर कठोर मेहनतही घेत आहे. प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याने नॉनव्हेज आणि दारू सोडली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारण्यासाठी रणबीरने तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 'रामायण'च्या एका भागासाठी अभिनेत्याने ७५ कोटी रुपये फी घेतली आहे. दरम्यान, 'रामायण'मध्ये साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर यश रावणाची भूमिका साकारणार आहे. लारा दत्ता, आदिनाथ कोठारे, सनी देओल, अरुण गोविल, रवी दुबे अशी सिनेमाची स्टारकास्ट आहे. या सगळ्यांपेक्षा रणबीरने 'रामायण'साठी घेतलेलं मानधनं कितीतरी पटीने जास्त आहे.