'त्या' चित्रपटातील किसिंग सीन पाहून रणबीरने 'अॅनिमल'ला दिला होता होकार? नागार्जुनचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:58 IST2025-11-12T19:50:23+5:302025-11-12T19:58:09+5:30
सुपरस्टार नागार्जुन यांनी नुकताच रणबीर कपूरबद्दल मोठा खुलासा केला आहे.

'त्या' चित्रपटातील किसिंग सीन पाहून रणबीरने 'अॅनिमल'ला दिला होता होकार? नागार्जुनचा खुलासा
संदीप रेड्डी वांगा यांच्या 'अॅनिमल' (Animal) चित्रपटाने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) अभिनयातील कारकिर्दीतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. त्यात रणबीर कपूर कधीही न पाहिलेल्या अशा लूकमध्ये समोर आला होता. या चित्रपटातील बोल्ड आणि इंटिमेट सीन्समुळे (Intimate Scenes) बरीच चर्चा रंगली. रणबीर कपूरने हा चित्रपट स्वीकारण्यामागे एक खास आणि धक्कादायक कारण दडलेले असल्याचे आता उघड झाले आहे. नुकताच एका मुलाखतीत दक्षिणेकडील सुपरस्टार नागार्जुन यांनी यावर महत्त्वपूर्ण खुलासा केला.
अलीकडेच, 'व्हाय नॉट सिनेमा' (Why Not Cinema) या प्लॅटफॉर्मवर संदीप रेड्डी वांगा, नागार्जुन आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यात एक चर्चासत्र झालं. याचा एक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. या चर्चेदरम्यान नागार्जुन म्हणाला, "आम्ही जेव्हा 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण करत होतो, तेव्हा रणबीर 'अॅनिमल'बद्दल खूप उत्सुक होता. त्याने संदीप रेड्डी वांगा यांचा मागील सुपरहिट चित्रपट शोधायला सुरुवात केली. त्याला अखेरीस 'अर्जुन रेड्डी'ची तेलुगू आवृत्ती सापडली".
नागार्जुन पुढे म्हणाले, "'अर्जुन रेड्डी'त विजय देवरकोंडाने अभिनेत्रीला किस करतानाचा तो सीन पाहिल्यानंतर रणबीर म्हणाला, 'हे अगदी खरे आहे' आणि तो खूप उत्साही दिसत होता". यावर वांगा यांनी स्पष्ट केले की, रणबीर सुरुवातीपासूनच 'अॅनिमल'साठी तयार होता. अर्थात, 'अर्जुन रेड्डी'मधील दमदार आणि बिनधास्त दृश्यांच्या 'रिअॅलिझम'मुळे रणबीरची उत्सुकता वाढली असावी.
'अॅनिमल पार्क' कधी येणार?
'अॅनिमल'च्या अफाट यशानंतर आता निर्माते या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच 'अॅनिमल पार्क' (Animal Park) घेऊन येत आहेत. हा चित्रपट २०२७ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, 'अॅनिमल पार्क'मध्ये रणबीर कपूर दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रणबीर आणि संदीप रेड्डी वांगा यांची ही यशस्वी जोडी पुन्हा एकदा पडद्यावर काय कमाल दाखवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.