'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी सध्या काय करतेय? डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:16 IST2024-12-22T09:59:17+5:302024-12-22T10:16:49+5:30
ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी मंदाकिनी सध्या काय करतेय ?

'राम तेरी गंगा मैली'ची मंदाकिनी सध्या काय करतेय? डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं नाव!
Ram Teri Ganga Maili Actress Mandakini : सिनेविश्वात स्टारडम मिळवणे जितके कठीण आहे, तितकेच ते टिकवून ठेवणेही कठीण आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटातून यश मिळालं. पण ते फार काळ टिकलं नाही आणि त्या अभिनेत्री अल्पावधीतच इंडस्ट्रीतून गायब झाल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणारी मंदाकिनी. जबरदस्त स्टारडम मिळवल्यानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीमधून गायब झाली. ती सध्या काय करतेय? कुठे आहे? असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत असतात. तर याविषयी जाणून घेऊया.
मंदाकिनीचं खरं नाव यास्मिन जोसेफ आहे. यास्मिन जोसेफ हिला मंदाकिनी बनवण्याचं श्रेय राज कपूर यांना जातं. यास्मिन जोसेफच्या सौंदर्याने राज कपूर इतके मंत्रमुग्ध झाले होते की त्यांनी 16 वर्षांच्या यास्मिनला त्यांचा मुलगा राजीव कपूर सोबत मंदाकिनी नावाच्या चित्रपटात लॉन्च केलं. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि राजीवपेक्षा मंदाकिनीला जास्त प्रसिद्धी मिळाली.
एकाच चित्रपटातून तिला रातोरात स्टारडम मिळालं आणि तिच्यासमोर जणू चित्रपटांची रांग लागली. मिथुन चक्रवर्ती, आदित्य पांचोली आणि गोविंदा सारख्या स्टार्ससोबत तिनं चित्रपट केले. एकिकडे हे सिनेमे हिट झाले. पण, दुसरीकडे मंदाकिनीचे करिअर डबघाईला येत होतं. यशाच्या शिखरावर असताना तिचं नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलं गेलं होतं. मंदाकिनी आणि दाऊदचा एक फोटोही लीक झाला होता. ज्यामुळे देशात खळबळ उडाली होती.
चर्चा रंगली होती की, दिग्दर्शक मंदाकिनीला चित्रपटात साईन करण्यापासून कचरत होते. दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनीही त्यांच्या डायल डी फॉर डॉन या पुस्तकात नमूद केले आहे की, दाऊद इब्राहिमने अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मंदाकिनी या चित्रपटात साईन न करण्याची धमकी दिली होती, ज्याचा अभिनेत्रीच्या करिअरवर नकारात्मक परिणाम झाला होता. तर, मंदाकिनीने अनेक मुलाखतींमध्ये दाऊदसोबतचे नाते नाकारलं होतं.
मंदाकिनीनं 1990 मध्ये माजी बौद्ध भिक्खू डॉ. काग्युर टी. रिनपोचे ठाकूर यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. अभिनेत्रीने तिच्या शेवटच्या चित्रपट 'जोरदार'नंतर ब्रेक घेतला. आज ती चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नाही. लग्नानंतर तिनं तिब्बतन योगा क्लासेस चालवले. पण काही महिन्यांपूर्वी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ती एका चित्रपटात काम करत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, तिनं सिनेमाचं नाव उघड केलं नाही. आता तिला पुन्हा चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.