"भारतात एक दिवस दिवाळी असते तर गाझामध्ये..."; राम गोपाल वर्मांच्या वक्तव्यामुळे फुटलं वादाला तोंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:53 IST2025-10-21T16:52:35+5:302025-10-21T16:53:31+5:30
राम गोपाल वर्मांनी एक नवीन ट्विट केलंय. त्यामुळे सर्वांनी त्यांच्यावर टीका केली असून त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे

"भारतात एक दिवस दिवाळी असते तर गाझामध्ये..."; राम गोपाल वर्मांच्या वक्तव्यामुळे फुटलं वादाला तोंड
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे त्यांच्या स्पष्ट आणि अनेकदा वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राम गोपाल वर्मा यांनी गाझा येथे सुरू असलेल्या युद्धाशी दिवाळी सणाची तुलना केली, ज्यामुळे सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राम गोपाल वर्मा यांनी २० ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीच्या दिवशी एक ट्विट केलं, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की, "In INDIA only one day is DIWALI and in GAZA, every day is DIWALI🔥🔥🔥" म्हणजेच भारतात फक्त एक दिवस दिवाळी असते आणि गाझामध्ये रोज दिवाळी असते. या ट्विटमध्ये त्यांनी फटाक्यांची आग आणि बॉम्बस्फोटांमुळे निर्माण होणारी आग याची तुलना करण्याचा प्रयत्न केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर राग व्यक्त केला आहे.
वर्मा यांच्या या तुलनात्मक ट्विटमुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण आहे, तर गाझा (Gaza) येथे युद्धामुळे रोज हजारो लोक मरत आहेत. त्यामुळे एका आनंदी सणाची तुलना युद्धभूमीशी करणे लोकांना योग्य वाटलं नाही. ट्विटवर एका युजरने लिहिलं की, "एखाद्या उत्सवाची तुलना युद्धाशी करणं किती योग्य आहे, हे लिहिणाऱ्यालाच माहीत असेल. पण दिवाळीसारख्या दिवशी अशी पोस्ट पाहणं धक्कादायक आहे."
अनेकांनी वर्मा यांच्यावर टीका करताना म्हटले की, "हे ट्वीट करण्याची काय गरज होती? कोणत्या गोष्टीची तुलना कशाशी करत आहात?" तर काही युजर्सनी इतर बॉलिवूड कलाकारांना टॅग करून विचारले की, "राम गोपाल वर्मा यांना अचानक काय होतं?" राम गोपाल वर्मांच्या या ट्विटला काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले असले तरी, लोकांचा संताप आणि ट्रोलिंग वाढत चाललं आहे.