/>आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हे सामाजिक भान ठेऊन बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच अवयव दानाचा संकल्प केला आहे. तसेच इतरांनीही अवयव दान करावे असे आवाहनदेखील केले आहे. याआधीदेखील प्रियांकाने अवयव दानासाठी लोकांना आवाहन केलेले आहे. २००८ मध्ये ‘इंडियन नेशन असोशिएशन फॉर स्टडी आॅफ लिव्हर’च्या वार्षिक समारंभात प्रियांकाने अवयव दानाचे आवाहन केले होते. ‘आर्मी मेडिकल कॉर्प’ने या समारंभाचे आयोजन केले होते. भारतात अवयव दान करणाºयांची संख्या खूप कमी आहे. एखादी व्यक्ती जेव्हा अवयव दान करते तेव्हा ती केवळ एका व्यक्तीला मदत करत नसून त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, अशी भावना तिने त्यावेळी बोलताना व्यक्त केली होती. प्रियांका अनेक समाजसेवी कामे करत असून, ती कित्येक समाजसेवी संस्थांशी जोडलेली आहे. खासकरून बालकांशी निगडीत समाजसेवी संस्थांबरोबर ती कार्यरत आहे. तसेच मुलींच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी काम करणाºया भारतातील समाजसेवी संस्थेसाठीदेखील ती काम करते. ‘युनायटेड नेशन्स’च्या ‘गर्ल अप’ अभियानासाठी तिने काम केले असून, या माध्यमातून वैश्विक पातळीवर मुलींच्या स्थितीत सुधारणा आणण्यासाठी तिने कार्य केले आहे. युनिसेफची ‘नॅशनल अॅम्बेसिडर’ म्हणूनदेखील तिची निवड करण्यात आली होती.