१,३६८ मीटर उंचीवर अडकून पडले प्रभास व श्रद्धा कपूर! तेव्हा कुठे आला जीवात जीव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:51 IST2019-06-24T15:50:08+5:302019-06-24T15:51:43+5:30
होय, ऑस्ट्रियात शूटींग सुरु असताना प्रभास व श्रद्धाला एका आणीबाणीच्या स्थितीचा सामना करावा लागला.

१,३६८ मीटर उंचीवर अडकून पडले प्रभास व श्रद्धा कपूर! तेव्हा कुठे आला जीवात जीव!!
प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘साहो’ या चित्रपटाकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. अॅक्शन व थ्रीलर दृश्यांनी भरलेला हा टीजर प्रेक्षकांना प्रचंड आवडला. तूर्तास ऑस्ट्रियात या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्यूलचे शूटींग सुरु आहे आणि याचदरम्यानची बातमी आहे. होय, ऑस्ट्रियात शूटींग सुरु असताना प्रभास व श्रद्धाला एका आणीबाणीच्या स्थितीचा सामना करावा लागला.
मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रियाच्या पर्वतरांगामध्ये शूटींग सुरु असताना प्रभास व श्रद्धा केबल कारमध्ये अडकले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत गुरुवारी शूटींग संपल्यानंतर केबल कारने परतत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला आणि केबल कार अर्ध्या रस्त्यात बंद पडली. प्रभास व श्रद्धा तसेच युनिटमधील काही लोक १,३६८ मीटर उंचीवर अडकून पडले. पाऊस अधिकच जोर धरू लागल्यावर सगळेच घाबरले. पण यादरम्यान प्रभासने सगळ्यांना धीर दिला. पाऊस थांबल्यानंतरच केबल कार सुरु होईल. तोपर्यंत सर्वांनी हिंमतीने काम घ्या, असे त्याने सर्वांना समजावले. अखेर अर्ध्या तासानंतर पाऊस थांबला आणि केबल कार पुन्हा सुरु झाली. सगळी टीम सुखरूप मुक्कामी पोहोचल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला.
‘साहो’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला रिलीज होतोय. हिंदी, तामिळ व तेलगू अशा तीन भाषांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रभास व श्रद्धाशिवाय मंदिरा बेदी, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे यात महत्त्वपूर्ण भूमिकांत आहेत. ‘बाहुबली 2’नंतर ‘साहो’ हा प्रभासचा पहिला चित्रपट आहे. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.