Pathaan Movie Review : पैसा वसूल शाहरुख खानचा 'पठाण', सिनेमा पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:13 PM2023-01-25T19:13:44+5:302023-01-25T19:14:51+5:30

Pathaan Movie Review : जाणून घ्या कसा आहे, शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा 'पठाण' चित्रपट

Pathaan Movie Review : Paisa Vasool Shah Rukh Khan's 'Pathan', read this review before watching the movie | Pathaan Movie Review : पैसा वसूल शाहरुख खानचा 'पठाण', सिनेमा पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

Pathaan Movie Review : पैसा वसूल शाहरुख खानचा 'पठाण', सिनेमा पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : शाहरूख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा, डिंपल कपाडिया आणि सलमान खान
लेखक व दिग्दर्शन : सिद्धार्थ आनंद
स्टार : ४ स्टार्स
चित्रपट परीक्षण : आशिष जैन

पठाण...पठाण...पठाण.. अखेर मोठ्या पडद्यावर ‘पठाण’ची दमदार एंट्री झालीच. बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरूख खानच्या कमबॅकसाठी जसा पॉवरपॅक्ड चित्रपट गरजेचा होता, तसा नक्कीच ‘पठाण’च असू शकतो. या चित्रपटाच्या बाबतीत काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू होती. आता चित्रपट प्रेक्षकांसमोर आलाय. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे एखादा जणूकाही सोहळाच म्हणावा लागेल. लार्जर दॅन लाइफ ॲक्शन सीन्स, जबरदस्त ग्रँड ठिकाणं, दिग्गज अभिनेत्यांचा उत्कृष्ट परफॉर्मन्स हे सर्वच यात आहे. चित्रपटात एक संवाद आहे, ‘पठान के घर में पार्टी रखोगे, तो मेहमाननवाजी के लिए पठान तो आएगा, साथ में पटाखे भी लाएगा ! ’ या चित्रपटावर तंतोतंत खरा ठरतो. कारण यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा ‘पठाण’ खरंच कुठल्याही धमाक्यापेक्षा कमी नाही. चला तर मग बघूयात, चित्रपटात काय विशेष आहे ते..

कथानक :
चित्रपटाची कहाणी देशाच्या दोन अंडरकव्हर एजंट्सची आहे. एक, देशासाठी सगळं समर्पित करण्यासाठी तयार असलेला ‘पठाण’(शाहरुख खान) तर दुसरा, आपल्याच देशाविरुद्ध जाऊन शत्रूसोबत हातमिळवणी करणारा जिम (जॉन अब्राहम). काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यापासून पाकिस्तानात दहशत माजते. दरम्यान, एका खासगी दहशतवादी गटासोबत भारतात व्हायरसच्या माध्यमातून हाहाकार माजवण्याचे प्लॅनिंग असते. या दहशतवादी गटाचा प्रमुख जिम असतो, जो एकेकाळी भारतीय गुप्तहेर एजन्सीचा रॉ एजंट म्हणून काम करत होता. परंतु, आता त्याच्या मनात देशाप्रति प्रचंड संताप आहे. ज्यामुळे तो हा विध्वंस करू इच्छित आहे. त्याच्या उद्देशांबद्दल कळल्यावर भारतीय गुप्तहेर एजेंसीला आठवण होते ती ‘पठाण’ची. जो स्वत:हून मिशनसाठी तयार होतो. यादरम्यान त्याची भेट आयएसआयची एजेंट रूबीना मोहसीन (दीपिका पादुकोण)सोबत होते. दोघे मिळून जिमचे मिशन संपवण्याचा प्रयत्न करू इच्छित असतात. मात्र, शत्रू एवढा जबरदस्त आणि भयानक आहे की, त्याचा खात्मा करण्यासाठी ‘टायगर’ (सलमान खान)ला यावे लागते. यानंतर पठाण आणि टायगर मिळून ॲक्शन आणि रोमांचची जी काही धम्माल करतात त्याला पडद्यावरच पाहणे योग्य वाटते.

लेखन व दिग्दर्शन :
‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या सिद्धार्थ आनंदने ‘पठाण’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. त्याने शाहरूखसारख्या सुपरस्टारच्या कमबॅकसाठी परफेक्ट मसालेदार पॅकेज बनवले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे ॲक्शन सिक्वेन्स, रोमांच, रोमान्स आणि देशभक्ती यांच्यासोबतच सलमान खानचा ‘टायगर’ अंदाजाला तडका देऊन बॉलिवूडमध्ये नव्या स्पाय युनिव्हर्सला जन्माला घातले आहे. सलमानने ‘टायगर’ बनून चित्रपटात दिसणे म्हणजे एक ट्रिटच आहे. चित्रपटाच्या कथानकात काही बाबतीत कमजाेरपणा दिसून येतो. ॲक्शन सीन्सच्या साह्याने ते झाकून टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा धिम्या गतीचा आहे. परंतु, टिवस्ट ॲण्ड टर्नसमुळे प्रेक्षक खिळून राहतात. दुसरा भाग एकदम जबरदस्त आहे. सिनेमॅटाेग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोर कथानकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. हवेत उडणारे फायटर जेट्स, रस्त्यावर गाड्यांचा टकराव, बसच्या वर फायटिंग आणि समुद्रात आदलाबदली या सर्वांमुळे प्रेक्षक आपल्या खुर्चीतून उठूच शकत नाहीत.

अभिनय :
जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खान जबरदस्त पॉवरपॅक्ड अवतारात परतलाय. त्याच्या अभिनयात स्वॅग आणि ॲटिट्यूड दिसून येतोय. सलमानच्या कॅमिओने चित्रपटात चार चाँद लावले आहेत. पठाण आणि टायगर जवळपास १० ते १२ मिनिटांची ॲक्शनची जुगलबंदी भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वांत उत्कृष्ट सीक्वेंसमधील एक आहे. दीपिकाच्या ॲक्शनसोबतच ग्लॅमर आणि रोमान्स हे सर्वच कमाल आहे. तिने तिच्या अभिनयातून स्वत:ला सिद्ध केले आहे. चित्रपटाचा प्रमुख आकर्षण जॉनची व्यक्तिरेखा जिम आहे. एक पॉवरफुल सुपरविलेनची भूमिका जॉन आपल्या एंट्रीपासून ते मध्यांतरापर्यंतच्या प्रत्येक सीनमधून साकारतो. चित्रपटात आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांनीदेखील उत्कृष्ट काम केले आहे.

सकारात्मकता : अभिनय, उत्कृष्ट ॲक्शन सीन्स, दीपिकाचा ग्लॅमर, बॅकग्राऊंड स्कोर, सिनेमॅटोग्राफी आणि जगभरातील नयनरम्य ठिकाणे.
नकारात्मकता : पहिला भाग धिम्या गतीने पुढे सरकतो.
थोडक्यात : पठाण हा बॉलिवूडचा परफेक्ट मसालापट आहे. ज्यात ॲक्शन, रोमान्स आणि देशभक्तीसोबतच टायगर अर्थात सलमान खान देखील आहे. शाहरूख आणि सलमान यांच्या चाहत्यांसाठी ही जबरदस्त ट्रीट असणार आहे. थिएटरमध्ये जाऊनच आनंद घ्यावा.

Web Title: Pathaan Movie Review : Paisa Vasool Shah Rukh Khan's 'Pathan', read this review before watching the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.