पंकज त्रिपाठीची लेक आशीचं वडिलांच्या पावलांवर पाऊल, 'लैलाज' मधून करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:21 IST2025-11-17T16:21:26+5:302025-11-17T16:21:54+5:30
pankaj tripathi daughter aashi tripathi: आता पंकज त्रिपाठींचा वारसा त्यांची मुलगी आशी त्रिपाठी पुढे घेऊन जाणार आहे. आशीने देखील आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

पंकज त्रिपाठीची लेक आशीचं वडिलांच्या पावलांवर पाऊल, 'लैलाज' मधून करणार पदार्पण
पंकज त्रिपाठींना आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. बिहारमधून अभिनेता होण्याची इच्छा घेऊन ते मायानगरी मुंबईत आले, टीव्ही शोजमध्ये काम केले आणि आज बॉलिवूड व ओटीटीचे बादशाह बनले आहेत. 'मिर्झापूर'चे कालीन भैया असोत किंवा 'स्त्री'चे रुद्र, प्रत्येक भूमिकेत पंकज त्रिपाठींनी जीव ओतला आहे. त्यांच्यानंतर आता पंकज त्रिपाठींचा वारसा त्यांची मुलगी आशी त्रिपाठी पुढे घेऊन जाणार आहे. आशीने देखील आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पंकज यांनी तिच्या पदार्पणाच्या प्रोजेक्टवर आनंद व्यक्त केला आहे.
खरेतर, पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यांनी थिएटरमधूनच आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आता ते निर्माते म्हणून थिएटरमध्ये एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. त्यांनी त्यांची पत्नी आणि बिझनेस मॅनेजर मृदुला त्रिपाठी यांच्यासह मिळून 'रूपकथा रंगमंच' नावाचे नवीन बॅनर सुरू केले आहे.
पहिल्या नाटकातून करणार पंकज यांची मुलगी पदार्पण
पंकज त्रिपाठी त्यांच्या बॅनरखाली 'लैलाज' नावाचा पहिला प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे, या नाटकाद्वारे पंकज यांची १८ वर्षांची मुलगी आशी त्रिपाठी रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. ती या नाटकात मुख्य भूमिकेत लाईव्ह परफॉर्मन्स देईल. आशीच्या पदार्पणाने तिचे आई-वडील खूप आनंदी आहेत.
या म्युझिक व्हिडीओद्वारे झाले होते आशीचे पदार्पण
फैज मोहम्मद खान दिग्दर्शित 'लैलाज' पूर्वीही आशी त्रिपाठीने अभिनयात पदार्पण केले होते. गेल्या वर्षी ती मैनाक भट्टाचार्यासोबत 'रंग डारो' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. ती लाइमलाइटपासून दूर राहते, पण अभिनयाच्या क्षेत्रासाठी ती सतत तयारी करत आहे. सध्या ती म्युझिक व्हिडीओ आणि थिएटरमध्ये काम करत आहे. लोकांना तिच्या बॉलिवूड पदार्पणाची प्रतीक्षा आहे.