मराठी वाचन आणि लिखाणाचा सराव करतोय 'हा' बॉलिवूड अभिनेता, म्हणाला "कर्मभूमीतल्या भाषेत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:39 IST2025-02-10T14:34:15+5:302025-02-10T14:39:03+5:30
बॉलिवूडच्या अघाडीच्या अभिनेत्यानं मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं.

मराठी वाचन आणि लिखाणाचा सराव करतोय 'हा' बॉलिवूड अभिनेता, म्हणाला "कर्मभूमीतल्या भाषेत"
बॉलिवूडमधील अनेक कलाकार मराठी चित्रपटांकडे आता वळताना दिसून येतात. बॉलिवूडमधील स्टार मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहेत. सलमान खान, प्रियंका चोप्रा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. आता आणखी एक बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेत्यानं मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हा अभिनेता आहे जयदीप अहलावत ( Jaideep Ahlawat). सध्या जयदीप अहलावतच्या 'पाताल लोक २'ची चांगलीच चर्चा आहे. 'पाताल लोक २'मध्ये हाथी राम चौधरी (जयदीप अहलावत) प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. जयदीप देखील या यशाने खूप आनंदी आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जयदीपचा अभिनय केवळ प्रेक्षकांनाच नाही तर इतर कलाकारांनाही आवडला. हरियाणातील रोहतकमध्ये जन्मलेल्या जयदीपला कर्मभूमी मुंबईप्रती प्रेम आहे.
नुकतंच जयदीप 'मुंबई टाईम्स'शी बोलताना मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं. तो म्हणाला, "मी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिकत होतो. तेव्हा फिरोदियासारख्या विविध स्पर्धांना आवर्जून हजर राहायचो. त्या कथांमधून माझ्यातला कलाकार समृद्ध व्हायचा. 'नटसम्राट' हा मराठी चित्रपट माझ्या हृदयाजवळचा आहे. माझ्या कर्मभूमीतल्या भाषेच्या जवळ जाण्याचा नी प्रयत्न करतोय. दोन प्रोजेक्टच्या मधल्या काळात मी मराठी वाचन आणि लिखाणाचा सराव करतोय. भविष्यात, मराठी चित्रपटासाठी विचारणा झाली तर मी तो जरूर करेन", असं त्यानं म्हटलं.
जयदीप आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच मनोज वाजपेयीच्या 'द फॅमली मॅन' वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार अशी चर्चा आहे. इतकंच नव्हे जयदीप आणि मनोज यांच्यामध्ये संघर्ष होताना दिसणार आहे. आता खरंच असं घडलं तर, 'द फॅमिली मॅन ३' बघणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही. 'द फॅमिली मॅन ३'चं सध्या एडिटींगचं काम सुरु असून ही वेबसीरिज या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे. याविषयी अधिकृत माहिती अजून समोर आली नाहीये.