ए. आर. रहमान यांनी अजमेर दर्ग्यावर चढवली चादर, यावेळी काय मागितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:17 IST2025-05-07T16:12:46+5:302025-05-07T16:17:45+5:30
कलाकारांची सर्वात आवडती जागा अजमेर शरीफ दर्गा ही आहे. अनेकदा कलाकार या दर्ग्यात कायम चादर चढवण्यासाठी येतात.

ए. आर. रहमान यांनी अजमेर दर्ग्यावर चढवली चादर, यावेळी काय मागितलं?
ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान हे संगीताचे जादुगार आहेत. संगीतातला देव अशी ओळख असलेले ए. आर. रहमान यांनी आपल्या अनोख्या संगीताने संपूर्ण जगाला वेड लावले. भारतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण मानाचा ऑस्कर पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांचे आज जगभरात चाहते आहेत. अशातच ए. आर. रहमान यांनी ए.आर. रहमान यांनी अजमेर येथे प्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यावर चादर आणि फुले अर्पण केली.
नुकतंच प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान हे अजमेर दर्ग्यावर पोहोचले. यावेळी त्यांनी नव्या कामाच्या यशासाठी प्रार्थना केली. रहमान यांनी यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून, चाहत्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला.
दर्ग्यातील खादिम सय्यद मुशीर हुसेन चिश्ती यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर. रहमा दर्ग्यात पोहोचले. दरम्यान, हाजी सय्यद फरहान चिश्ती यांनी त्यांना दरबारातील तबरुक (पवित्र प्रसाद) भेट दिला. फरहान चिश्ती यांनी सांगितले की, "ए.आर. रहमान जेव्हा जेव्हा कोणतेही नवीन प्रोजेक्ट सुरू करतात, तेव्हा ते ख्वाजांच्या दरबारात येऊन यशासाठी प्रार्थना करतात. यावेळीही त्यांनी तसंच केलं आहे".
विशेष म्हणजे, ए.आर. रहमान यांचा अजमेरमध्ये, बस स्थानकाजवळ कुंदन नगर येथे एक बंगला आहे. ते वेळ मिळेल तेव्हा तिथे वास्तव्यास राहतात आणि सहजतेने दर्ग्याला भेट देतात. ख्वाजा गरीब नवाजांवर असलेली रहमान यांची श्रद्धा त्यांच्या संगीतातूनही दिसून येते. 'ख्वाजा मेरे ख्वाजा दिल में समा जा' हे गाणं त्यांच्या भावनिक आणि अध्यात्मिक नात्याचं प्रतीक आहे.
राजस्थानातील अजमेर येथे प्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा शरीफ आहे. येथे केवळ देशातीलच नाही, तर परदेशातून लोक येत असतात. येथे आल्यानंतर दर्ग्यावर मोठ्या श्रद्धेने चादर चढवली जाते. हे कार्य अत्यंत पवित्र मानले जाते. कलाकारांची सर्वात आवडती जागा अजमेर शरीफ दर्गा ही आहे. अनेकदा कलाकार या दर्ग्यात कायम चादर चढवण्यासाठी येतात.