अरे बापरे...! बाहुबली फेम प्रभास गिरवतोय चक्क हॉलिवूडच्या ५० लोकांकडून अॅक्शनचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 20:35 IST2019-04-05T20:35:00+5:302019-04-05T20:35:00+5:30
'बाहुबली' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता लवकरच तो 'साहो' चित्रपटात झळकणार आहे.

अरे बापरे...! बाहुबली फेम प्रभास गिरवतोय चक्क हॉलिवूडच्या ५० लोकांकडून अॅक्शनचे धडे
'बाहुबली' चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतो. आता लवकरच तो 'साहो' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी देखील तो खूप मेहनत घेतो आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत यातील अॅक्शन सीनवर बारकाईने लक्ष देऊन काम करत आहेत. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी हॉलिवूडमधील पन्नास जणांची टीम भारतात आली आहे. जी प्रभासला अॅक्शनचे धडे देणार आहेत.
'साहो'च्या अॅक्शनसाठी, हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात आलेली आहे जी प्रभासला वेगळ्या अॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलीवूड चित्रपटांसाठी काम केले आहे. या ५० लोकांची टीम प्रत्येक लहान लहान हालचाली पासून ते प्रत्येक फ्रेम बद्दल प्रभासला ट्रेनिंग देणार आहेत. ज्यामुळे अॅक्शन सीन अधिक प्रभावी होईल.
ट्रान्सफॉर्मर्स फेम, हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट डिरेक्टर केनी बेट्स यांनी 'साहो' चित्रपटातील अॅक्शन सीन दिग्दर्शित केले असून ते प्रभासची अफाट इच्छा शक्ती आणि समर्पण पाहून खूपच प्रभावित झाले आहेत.
'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट केला गेला आहे. प्रभासला 'साहो' चित्रपटात अॅक्शन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.