‘माझं पॅशन अॅक्टिंगच!’ - अक्षय ओबेरॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 19:14 IST2017-07-21T13:44:46+5:302017-07-21T19:14:46+5:30
अबोली कुलकर्णी ‘इसी लाईफ मैं’,‘पिझ्झा’,‘पिकू’,‘फितूर’,‘लाल रंग’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय ओबेरॉय सध्या ‘गुडगाव’ या त्याच्या आगामी ...
.jpg)
‘माझं पॅशन अॅक्टिंगच!’ - अक्षय ओबेरॉय
‘इसी लाईफ मैं’,‘पिझ्झा’,‘पिकू’,‘फितूर’,‘लाल रंग’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय ओबेरॉय सध्या ‘गुडगाव’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी आणि एकंदरितच त्याच्या करिअरविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
* तुझ्या आगामी ‘गुडगाव’ चित्रपटाविषयी काय सांगशील ?
- मी असं म्हणेन की, श्रीमंत वडिलांचा बिघडलेला मुलगा ‘निकी’ अशी व्यक्तिरेखा मी करतो आहे. त्याच्याकडे लहानपणापासूनच कायम दुर्लक्ष होत आलेले असते. त्याच्या वडिलांचे मात्र मुलीवर जास्त प्रेम असते. मात्र, तो संपूर्ण प्रॉपर्टी मिळवण्यासाठी काय काय करतो, हे सर्व पडद्यावर पाहण्यातच मजा आहे.
* अक्षय, तू चित्रपट, टीव्ही, थिएटर या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहेस. तू स्वत:ला कोणत्या माध्यमांत स्वत:ला पाहणे जास्त पसंत करशील ?
- अर्थात चित्रपटांमध्ये. लहानपणापासून ज्या गोष्टीचे मी स्वप्न पाहिले, ती जर मला करायला मिळणार असेल तर मी नक्कीच अभिनयाला पसंती देईल. सध्य बॉलिवूडमध्ये अशी परिस्थिती आहे की, गॉडफादर नसणाऱ्यांना काम मिळणं फारच मुश्किल झालं आहे. खुप जास्त संघर्ष आहे. मात्र, तरीही पॅशन अॅक्टिंगच आहे.
* स्क्रिप्ट निवडताना तू कोणत्या बाबींचा विचार करतोस ?
- फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे काम मिळणं आणि करणं. स्ट्रगल काळात फेम महत्त्वाची नसते. तुम्हाला नशीबाने सगळ्या गोष्टी मिळत जातात. एखादी संधी जर तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही तिचे स्वागतच केले पाहिजे. ‘माझ्याकडे भरपूर साऱ्या स्क्रिप्ट येतात, असं काही नाही. पण, हो, स्क्रिप्ट आली की, मी माझी भूमिका किती दर्जाची आहे, याकडे लक्ष देतो.
* तू ‘पिझ्झा’ या हॉरर चित्रपटात काम केलं आहेस. हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये काम करायला तुला जास्त आवडते का?
- असं काही नाही. माझ्याकडे ‘पिझ्झा’ची आॅफर आली होती. त्यावेळी तो चित्रपट कोणत्या प्रकारचा आहे यापेक्षा माझी भूमिका कशी आहे? याकडे माझे जास्त लक्ष होते. इतर विषयांवरील सिनेमेही मी केले आहेत. हॉरर चित्रपट अजूनही मला मिळाला तर नक्की करेन.
* अक्षत वर्मा यांच्या ‘कालाकंडी’ या चित्रपटात तू सैफ अली खानसोबत काम करत आहेस. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- अभिनेता सैफ अली खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच बढिया होता. आम्ही कालाकंडी मध्ये भावांची भूमिका करत आहोत. या चित्रपटाची २५-३० दिवस शूटिंग आम्ही केली आहे. रात्री शूटिंग करण्याची मजाच काही और असते. त्यांचा अनुभव खुप जास्त आहे. मला बरंच काही शिकायला मिळालं. एक अभिनेता म्हणून ते उत्कृष्ट आहेत.
* वेबसीरिजमध्ये काम करायला तुला आवडते काय? तुझ्या आगामी वेबसीरिजविषयी काय सांगशील?
- होय. मला वेबसीरिजमध्ये काम करायला आवडतं. खरंतर मी वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. माझी आगामी वेबसीरिज सप्टेंबर मध्ये रिलीज होणार आहे. यात माझ्यासोबत करण वही देखील असतील. ‘वेबसीरिज’ हेच आता मनोरंजन दुनियेचं भविष्य असल्याने आत्ताच जर मी ते शिकून घेतलं तर माझे फ्युचर ब्राईट आहे, असं म्हणायला हरकत नाही.
* तुझा ड्रीम रोल काय आहे?
- जुन्या जमान्यातील चित्रपट मला बेहद आवडतात, माझा ड्रीम रोलही तोच आहे. तशाच प्रकारच्या एखाद्या सेटवर काम करायला मला आवडेल. जुन्या स्टाईलचे सेटस, कॉस्च्युम आणि डायलॉग्ज ही तशाच प्रकारचे असतील तर फारच मजा येईल. असा एखादा रोल जर मला आॅफर झाला तर मी करेन.
* आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुझे प्रेरणास्थान कोण आहे?
- माझ्या आयुष्यात असे अनेक जण आहेत, ज्यांना मी प्रेरणास्थानी मानतो. पण, अमिताभ बच्चनजी, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांची नावे मी आवर्जून घेऊ इच्छितो. खरंतर, या ग्लॅमरच्या दुनियेत स्टारडम मिळणं तितकंसं सोप्पं राहिलं नाही. अपार कष्ट, मेहनत घेतल्यावरच या झगमगाटी दुनियेचे सुख आपल्याला उपभोगता येते. तसे सुख सध्या तिन्हीही खान उपभोगत आहेत. मी त्यांच्याप्रमाणेच एक दिवस यशाच्या शिखरावर असेन, यात काही शंका नाही.