रणबीरच्या 'रामायण'ची मुकेश खन्नांना होती ऑफर, पण अभिनेत्याचा स्पष्ट नकार, म्हणाले- "मी दाढी लावणार नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 16:54 IST2025-08-16T16:53:51+5:302025-08-16T16:54:25+5:30
'रामायण'मध्ये लारा दत्ता, सनी देओल, यश, रवी दुबे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी मुकेश खन्ना यांनाही विचारणा झाली होती. मात्र त्यांनी 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार दिला.

रणबीरच्या 'रामायण'ची मुकेश खन्नांना होती ऑफर, पण अभिनेत्याचा स्पष्ट नकार, म्हणाले- "मी दाढी लावणार नाही..."
नितेश तिवारींच्या 'रामायण'ची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. 'रामायण'मध्येरणबीर कपूर प्रभू श्री राम तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहेत. 'रामायण'मध्ये लारा दत्ता, सनी देओल, यश, रवी दुबे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी मुकेश खन्ना यांनाही विचारणा झाली होती. मात्र त्यांनी 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. तसंच यामागचं कारणही सांगितलं.
मुकेश खन्ना यांनी नुकतंच फिल्मीज्ञानला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना "रामायण सिनेमात कोणत्या भूमिकेची ऑफर मिळालेली का?", असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, "काही पौराणिक कथांसाठी मध्ये विचारणा झाली होती. पण, मी त्यांना सांगितलं की भीष्म पितामह यांची भूमिका साकारल्यानंतर मी कोणती भूमिका साकारू? इंद्र? सूर्य की नारदमुनी? पितामह भीष्म यांच्यापेक्षा वरचढ भूमिका असेल तर मी साकारेन. आणि मला हे माहितीये की भीष्मपेक्षा श्रेष्ठ कोणतीही भूमिका नाही. एवढा मोठा योद्धा, धर्मात्मा, भूमिका साकारण्याचा खूप मोठा स्कोप...त्यामुळे मी ४-५ वेळा नाही सांगितलं".
"'रामायण'मध्ये ते मला फार फार तर व्यासमुनींची भूमिका देतील. 'रामायण'मध्ये ते मला राम तर बनवणार नाहीत. व्यासमुनी म्हणजे दाढी लावावी लागेल. जे शक्य नाही. मी दाढी लावणार नाही ही माझी अट आहे. खलनायक किंवा रोमँटिक भूमिका साकारणार नाही. तर मग तुम्हाला मुकेश खन्नाला घ्यायचं असेल तर घ्या. मग मी 'रामायण' का करू?", असं ते म्हणाले.