मुकेश खन्नांना रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर रुचेना! म्हणाले- "रामायणात त्याला घ्यायची गरज नव्हती..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 18:19 IST2025-08-12T18:18:46+5:302025-08-12T18:19:12+5:30
'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीरची श्रीरामाच्या लूकमधील झलकही पाहायला मिळाली. यावर आता शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरला श्रीरामाच्या रुपात पाहणं मुकेश खन्नांना रुचलेलं नाही.

मुकेश खन्नांना रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर रुचेना! म्हणाले- "रामायणात त्याला घ्यायची गरज नव्हती..."
नितेश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमाची सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्री राम यांची भूमिका साकारणार आहे. 'रामायण'च्या टीझरमध्ये रणबीरची श्रीरामाच्या लूकमधील झलकही पाहायला मिळाली. यावर आता शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरला श्रीरामाच्या रुपात पाहणं मुकेश खन्नांना रुचलेलं नाही.
मुकेश खन्ना यांनी 'गलाटा इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'रामायण' आणि रणबीर कपूरबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, "रामाला झाडावर चढताना आणि धनुष्य चालवताना दाखवलं गेलं आहे. कृष्ण आणि अर्जुन असं करू शकतात पण राम नाही. जर रामाने स्वत:ला योद्धा मानलं असतं तर त्याने वानरांकडे कधीच मदत मागितली नसती. रावणासाठी राम एकटाच पुरेसा होता. रणबीर कपूर रामाची भूमिका योग्यप्रकारे साकारेल की नाही याबाबत शंका आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. पण, अॅनिमल सिनेमामुळे त्याची एक इमेज बनली आहे. मला त्यावर आक्षेप नाही. पण, त्याच्याकडे तसंच पाहिलं जातं".
"रामायणापेक्षा मोठा विषय असू शकत नाही. पण, आदिपुरुषची त्यांनी चटणी बनवून टाकली. आता कोणीतरी वेगळं रामायण बनवत आहे. तुम्हीदेखील त्याचप्रकारे बनवलं तर हिंदू तुम्हाला सोडणार नाहीत. रामायण फक्त १००० कोटींच्या बजेटने नाही तर कंटेटने बनतं. जसं की शक्तिमान स्टार्सने नाही तर कंटेटमुळे बनलं. रामायणमध्ये मोठ्या स्टार्सला घेण्याची गरज नव्हती", असंही मुकेश खन्ना म्हणाले.