गुलजार यांच्या गीतांचा परिसस्पर्श लाभलेल्या रिवा राठोडचा मौला अल्बम रसिकांच्या भेटीला, मायकल जॅक्सनही रिवासाठी प्रेरणास्त्रोत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 16:30 IST2018-06-21T11:00:28+5:302018-06-21T16:30:28+5:30
प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी आपल्यासाठी गाणं लिहावं अशी प्रत्येक गायक आणि गायिकेची इच्छा असते.त्यातच त्या गायक किंवा गायिकेच्या पहिल्यावहिल्या ...

गुलजार यांच्या गीतांचा परिसस्पर्श लाभलेल्या रिवा राठोडचा मौला अल्बम रसिकांच्या भेटीला, मायकल जॅक्सनही रिवासाठी प्रेरणास्त्रोत
प रसिद्ध गीतकार गुलजार यांनी आपल्यासाठी गाणं लिहावं अशी प्रत्येक गायक आणि गायिकेची इच्छा असते.त्यातच त्या गायक किंवा गायिकेच्या पहिल्यावहिल्या गाण्याची रचना गुलजार साहेबांनी केली असेल तर ते गाणं त्या गायक किंवा गायिकेसाठी जीवनातील अमूल्य असा ठेवा बनून जातो.असंच काहीसं झालं आहे उद्योन्मुख गायिका रिवा राठोड हिच्याबाबत घडलं आहे.गायक रुपकुमार राठोड आणि गायिका सोनाली राठोड यांची लेक असलेल्या रिवाला गायकीचा वारसा रक्तातून मिळाला आहे. रिवाच्या पहिल्या अल्बममधील सहा गीत गुलजार यांच्या लेखणीतून साकारली आहेत. आपल्या लेखणीतून साकारलेल्या उत्तमोत्तम गीतांनी गुलजार यांनी गेली अनेक पिढ्यांची मनं जिंकली आहेत. नुकताच रिवा राठोडचा पहिला अल्बम 'मौला' रसिकांच्या भेटीला आला आहे. या अल्बमला रिवाने स्वतः संगीत दिलं असून गाणी गायली आहेत. शिवाय रिवाने यात अभिनयसुद्धा केला आहे. पहिल्या अल्बमच्या लॉन्चिंगनंतर रिवा आनंदित आणि तितकीच एक्साईटेड आहे. त्यातच पहिल्याच अल्बमला गुलजार यांच्या लेखणीचा परिसस्पर्श लाभल्याने रिवाला आनंदाचं भरतं आलं आहे.गुलजार यांच्यासह काम करण्याची प्रत्येकाचं स्वप्न असते. रिवाही त्यांची फॅन आहे आणि पहिल्याच अल्बममध्ये गुलजारसाहेबांची साथ लाभल्याने ती भलतीच खूश आहे. गुलजारसाहेबांच्या शायरीचे सारेच फॅन आहेत. मात्र त्यांच्या शायरी आणि गीतांबद्दल बोलणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखं आहे असं रिवा मानते. जीवनात सुरुवातीपासूनच काही तरी हटके आणि वेगळे करण्याचा रिवाचा ध्यास आहे. रॉयल स्कूल ऑफ लंडनमधून ८ ग्रेड पियानो शिक्षण रिवाने विशेष प्राविण्यासह पूर्ण केले आहे. याशिवाय कर्नाटक संगीताचेही तिने धडे घेतले आहेत. याशिवाय भारतीय शास्रीय गायकीसुद्धा ती शिकली आहे. त्यामुळेच तिच्या गायकीत रसिकांना संगीताचे विविध रंग अनुभवायला मिळतील. तिच्या गायकीत इंग्रजी शब्दांचाही वापर ऐकायला मिळतो. हा प्रयोग तरुणाईला विशेष भावतो असं रिवाला वाटतं. एखादं गाणं कंपोझ करताना बराच विचार करावा लागतो असं रिवाला वाटतं. मात्र संगीत कंपोझ करणं एक दैवी देणगी आहे. शिवाय कंपोझर हा एक मूर्तीकाराप्रमाणेच असतो. गायक-गायिका आपल्या गायकीने त्या मूर्तीत जीव ओतून त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करतात असं रिवा मानते. रिवा प्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सनची फॅन आहे. मायकल एक महान कलाकार होता आणि त्याच्यासारखा कलाकार यापुढे होणे नाही असं रिवा सांगते. मायकलची जबरदस्त फॅन असलेल्या रिवाने तिच्या अल्बममधील गाण्यात मायकलच्या वोकल टेक्निकचाही प्रयोग केला आहे. गायकीचा वारसा घरातूनच लाभलेल्या रिवाने गायकीवर बरीच मेहनत घेतली आहे.गायकासाठी रियाजाचं विशेष महत्त्व असतं. कायम सकाळी लवकर उठून रियाज केला पाहिजे असं ती मानते. मात्र रात्री उशीरापर्यंत काम केल्यानंतर सकाळी लवकर उठणं कठीण असतं. त्यामुळे रिवा सकाळी उठल्या उठल्या रियाज करते. सध्याच्या तरुण गायक आणि गायिकांमध्ये शिकण्याची प्रक्रिया कमी झाली आहे असं बोललं जातं. मात्र ही बाब रिवाला मान्य नाही. तुम्हाला योग्य शिक्षण मिळालं असेल तर कोणत्याही प्रकारचं अन् कोणत्याही ढंगाचं गाणं गाऊ शकता असं रिवाला वाटतं. शिक्षणाचा पाया जितका मजबूत तितकंच चांगलं इमारतरुपी गाणं होईल असा रिवाला विश्वास आहे. आगामी काळात रिवा रसिकांच्या भेटीला एक ठुमरी घेऊन येणार आहे. उस्ताद झाकिर हुसैन यांनी या ठुमरीची निर्मिती केली आहे हे आपलं भाग्य आहे असं रिवा म्हणते. याशिवाय जगातील सगळ्यात मोठा म्युझिक क्लब असणाऱ्या 'बुद्धा बार'साठीही रिवाने २ गाणी रेकॉर्ड केली आहेत. संगीत हे एक आपल्याला लाभलेलं सुंदर असं लेणं आहे.एक दैवी देणगी असलेल्या संगीताचा वारसा आपण जपला पाहिजे असं आवाहन रिवाने तरुण पीढीला केले आहे.