#MeToo: अभिनेत्री सिमरन सूरीनेही साजिद खानवर केला आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 19:17 IST2018-10-13T19:16:43+5:302018-10-13T19:17:51+5:30
सिमरन कौर सूरी हीने साजिदने आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचे म्हटले आहे.

#MeToo: अभिनेत्री सिमरन सूरीनेही साजिद खानवर केला आरोप
दिग्दर्शक साजिद खानवर तीन तरूणींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्यानंतर आता यात आणखीन एका अभिनेत्रींची भर पडली आहे. सिमरन कौर सूरी हीने साजिदने आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचे म्हटले आहे.
‘हिम्मतवाला’ चित्रपटामधील भूमिकेसाठी साजिदने मला स्वत:हून फोन करुन ऑडीशनसाठी बोलावले होते. त्यावेळी त्याने मला कपडे उतरवायला लावले असे तिने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा केल्याने ही अतिशय व्यावसायिक स्वरुपाची भेट असेल असे मला वाटले होते. मात्र साजिद त्याच्या घरातल्या कपड्यांमध्ये होता. त्याचे वागणे पाहून मला धक्का बसला आणि मी त्या ठिकाणाहून निघून आली.
सिमरन पुढे म्हणाली, चित्रपटात भूमिका द्यायची असल्यास मला अभिनेत्रीचे शरीर पाहणे आवश्यक असते असे साजिदने सांगितले. त्याला मी नकार देऊन आवाज वाढवल्यावर आवाज कमी कर घरात माझी आई आहे असेही तो म्हणाला. मी घरातून निघून गेल्यावर लगेचच त्याचा मोबाईल नंबर डिलीट केला. मात्र त्याने काही वेळात मला पुन्हा फोन केला. आपल्याला सोबत काम करायचे असेल तर आपण नीट राहायला हवे असे तो म्हणत होता. मात्र मला पुन्हा फोन करु नको असे सांगून मी त्याचा फोन कट केला.
अभिनेत्री सलोनी चोप्राने साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. तिने २०११ साली साजिद खानकडे मुलाखत देण्यासाठी गेली असतानाचा अनुभव यावेळी उघड केला. साजिद खानने यावेळी तुझ्यावर कधी लैंगिक अत्याचार झालेत का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्याचे तिने सांगितले. यासोबतच साजिद आपल्याला लैंगिक संबंधांबद्दल सांगू लागला असेही तिने म्हटले. साजिद मला वारंवार कॉल करत असे, तो कामाचे कधीही बोलत नसे. मी कोणते कपडे घातले आहेत असे प्रश्न तो मला विचारायचा. अनेकदा त्याने मला बिकिनीमधील फोटो पाठवण्यासाठी सांगितले होते, असेही सलोनीने सांगितले. इतर २ महिलांनीही साजिदवर अशाच प्रकारचे आरोप केले होते.