माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यूट्यूबवरून शिकले 'ही' गोष्ट, 'धक धक गर्ल'ने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:33 IST2025-12-26T18:16:23+5:302025-12-26T18:33:09+5:30
माधुरी दीक्षितनं पती श्रीराम नेने यांच्याबद्दल एक खास खुलासा केलाय.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यूट्यूबवरून शिकले 'ही' गोष्ट, 'धक धक गर्ल'ने केला खुलासा
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने ९० च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमे करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यशाच्या शिखरावर असताना माधुरीनं १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. करिअर सोडून ती विदेशात निघून गेली. माधुरीने लग्नानंतर पत्नी, आई व सून म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. तिची मुलंही तिथेच लहानाची मोठी झाली. जवळपास दशकभरानंतर माधुरी पुन्हा भारतात आली. तिने सिनेसृष्टीतही कमबॅक केलं. सध्या माधुरी तिच्या 'मिसेस देशपांडे' या नवीन वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या प्रमोशनासाठी माधुरी विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच तिनं पती श्रीराम नेने यांच्याबद्दल एक खास खुलासा केलाय.
माधुरीचे पती डॉ. नेने हे व्यवसायाने हृदयविकार तज्ज्ञ असले, तरी त्यांचा चित्रपट निर्मितीतील रस आणि तांत्रिक ज्ञान एखाद्या व्यावसायिक तंत्रज्ञालाही लाजवेल असे आहे. खुद्द माधुरीनेच एका मुलाखतीत डॉ. नेने यांच्या या वेगळ्या छंदाचा खुलासा केलाय. 'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितने सांगितले की, डॉ. नेने ज्या विषयात पडतात, त्याचे सखोल ज्ञान घेतल्याशिवाय ते शांत बसत नाहीत.
माधुरी म्हणाली, "जेव्हा कॅमेरामन आमच्या घरी येतात, तेव्हा त्यांना अनेकदा धक्का बसतो. कारण डॉ. नेने यांना कोणत्या प्रकारची लेन्स वापरली जात आहे, प्रकाशयोजना कशी असावी आणि कॅमेरा कसा काम करतो, याबद्दल सेटवरील एखाद्या तंत्रज्ञांपेक्षा जास्त माहिती असते".
या तांत्रिक कौशल्याची सुरुवात कोविड-१९ महामारीच्या काळात झाल्याचं तिनं सांगितलं. कोविड-१९ दरम्यान, एका जागतिक कार्यक्रमासाठी माधुरीच्या मुलाचा पियानो वाजवतानाचा व्हिडीओ घरूनच रेकॉर्ड करायचा होता. तेव्हा डॉ. नेने यांनी यूट्यूबवरुन कॅमेरा, लेन्स आणि लाइटिंगचे सर्व बारकावे आत्मसात केले. त्यामध्ये ते एवढे पारंगत झाले की आज त्यांच्या घरी चक्क व्यावसायिक कॅमेरा सेटअप तयार आहे.
मुलाखतीत माधुरीला मिश्किलपणे विचारण्यात आले की, डॉ. नेनेंना कधी चित्रपटात अभिनय करावा असं वाटतं का? तेव्हा माधुरीने विनोदाने उत्तर दिलं की, "जर असं झालं तर कामापेक्षा आमच्या गप्पाच जास्त होतील आणि शूटिंग राहून जाईल".