"आम्ही खूप रडलो, प्रार्थना केली..." नव्या वर्षाच्या सुरुवातीला करीना कपूरची पहिली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 09:32 IST2026-01-01T09:21:00+5:302026-01-01T09:32:08+5:30
सैफवरील जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख करत करीना कपूरची काळजाला भिडणारी पोस्ट, पाहा काय म्हणाली बेबो

"आम्ही खूप रडलो, प्रार्थना केली..." नव्या वर्षाच्या सुरुवातीला करीना कपूरची पहिली भावुक पोस्ट
Kareena Kapoor New Year Emotional Post : बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान कायम चर्चेत असते. करीना कपूरने सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत केलंय. तिनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी वाचून तिच्या चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. २०२५ हे वर्ष करीना, सैफ आणि त्यांच्या मुलांसाठी काळरात्र ठरले होतं. जानेवारी २०२५ मध्ये सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या आठवणींना उजाळा देत करीनाने नवीन वर्ष २०२६ बद्दल आशावाद व्यक्त केला आहे.
करीनाने सैफसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, "मागे वळून पाहतो, तेव्हा हे जाणवतं की आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत… आपण इतका लांबचा प्रवास केला आहे. २०२५ हे वर्ष आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी खूपच कठीण होतं, पण तरीही आम्ही डोकं वर ठेवून, हसत-खेळत आणि एकमेकांचा आधार घेत पुढे गेलो. आम्ही खूप रडलो, खूप प्रार्थना केल्या आणि आज इथे उभे आहोत".
आपल्या पोस्टमध्ये करीनाने मुलांच्या धैर्याचेही कौतुक केले. ती म्हणाली, "२०२५ ने आम्हाला शिकवलं की माणसाचा स्वभाव निर्भय असतो, प्रेम सर्वांवर मात करतं आणि आपण समजतो त्यापेक्षा मुलं अधिक धाडसी असतात... या संपूर्ण प्रवासात आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या आमच्या चाहत्यांचे, मित्रांचे आणि आम्हाला सतत पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वराचे".
नवीन वर्षाचे जोमाने स्वागत करताना करीना म्हणाली, "२०२६ मध्ये नव्या जोमाने, अपार कृतज्ञतेने, सकारात्मकतेने आणि ज्या गोष्टीत सर्वोत्तम आहे, ते म्हणजे चित्रपट... त्याविषयी अखंड उत्साह घेऊन प्रवेश करत आहोत… मी नेहमी म्हणते तसं की नेहमी उत्साहात राहा... सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा", अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, १६ जानेवारी २०२५ रोजी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाच्या व्यक्तीनं त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीरातून तुटलेला चाकू काढण्यासाठी पाच तास शस्त्रक्रिया करावी लागली होती. पाठीचा कणा आणि प्लास्टिक सर्जरी झाल्यानंतर सैफ मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर आला होता. या भीषण घटनेने संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं.