माझं घर काही कोरोनाचं हॉटस्पॉट नाही...; करण जोहर भडकला, वाचा कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:19 IST2021-12-15T13:18:06+5:302021-12-15T13:19:16+5:30
Karan Johar : करिना, अमृता यांना कोरोना झाला आणि करण जोहरला यासाठी जबाबदार ठरवलं गेलं...

माझं घर काही कोरोनाचं हॉटस्पॉट नाही...; करण जोहर भडकला, वाचा कारण
बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक कोरोना रूग्ण समोर आलेत आणि सगळीकडे खळबळ माजली. आधी करीना कपूर, अमृता अरोरा यांना कोरोना झाल्याची बातमी आली. (Kareena Kapoor Corona) पाठोपाठ अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि अभिनेता संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर या दोघींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या सर्वांनी करण जोहरच्या (Karan Johar) घरी पार्टी केली आणि ही पार्टीच भोवली, अशीही चर्चा रंगली. यानंतर काय, तर बीएमसीनं कोरोना चाचण्यांचा धडाकाच लावला. करण जोहरसह त्याच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यात आली. सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण या प्रकरणामुळे करण मात्र भडकला आहे. माझं घर काही कोरोनाचं हॉटस्पॉट नाही, अशा शब्दांत त्यानं आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर करणने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. यात त्याने त्याच्या घरी झालेल्या पार्टीबद्दलही स्पष्टीकरण दिलं. माझ्या घरी मी डिनर ठेवलं होतं. पार्टी नाही, असं त्याने स्पष्ट केलं.
करण जोहरची पोस्ट-
‘मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कोरोना टेस्ट केली असून देवाच्या कृपेने सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सुरक्षेखातर मी दोन वेळा चाचणी केली आणि दोन्ही वेळा माझे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगरपालिका करत असलेल्या कामगिरीचं मी खरंच कौतुक करतो. त्यांना माझा सलाम. पण माध्यमांच्या काही सदस्यांना मी सांगू इच्छितो की आठ लोक एकत्र आले म्हणजे पार्टी होत नाही. माझं घर हे काही कोविडचं हॉटस्पॉट नाही. आम्ही घरात काटेकोरपणे नियमांचं पालन करतो. आम्ही सर्वजण जबाबदार नागरिकांप्रमाणे वागतोय आणि मास्कचा सतत वापर करतोय. तथ्य माहित करून न घेता बातम्या देणा-या काही माध्यमांच्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनी संयम बाळगावा‘, अशी पोस्ट करण जोहरने लिहिली आहे.
करिना, अमृता, सीमा व महिप कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर बीएमसीने करण जोहर राहत असलेल्या इमारतीत आणि परिसरात कोविड स्क्रिनिंग सुरू केली होती.