पाकिस्तानला चकवा देणाऱ्या अधिकाऱ्याची कहाणी, 'द डिप्लोमॅट' उद्या OTT वर होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:22 IST2025-05-08T11:48:55+5:302025-05-08T12:22:59+5:30
शत्रूला चकवणारा तो एकटा अधिकारी! सत्य घटनेवर आधारित आहे 'द डिप्लोमॅट' सिनेमा!

पाकिस्तानला चकवा देणाऱ्या अधिकाऱ्याची कहाणी, 'द डिप्लोमॅट' उद्या OTT वर होणार प्रदर्शित
The Diplomat OTT Release: ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. मे महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज झाले. या आठवड्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याचा 'द डिप्लोमॅट' हा बहुचर्चित थ्रिलर चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी ठरल्यावर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.
'द डिप्लोमॅट' सिनेमा १४ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक प्रसंग आणि जबरदस्त अभिनयामुळे हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. शिवम नायर दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रेम दिल्याचं पाहायला मिळालं. थिएटरमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या चित्रपटाचं स्ट्रीमिंग नेटफ्लिक्सवर उद्या म्हणजे ९ मे २०२५ रोजी होणार आहे.
'द डिप्लोमॅट'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बोलायच झालं तर सिनेमानं चांगली कमाई केली आहे. NDTV नुसार, चित्रपटाने भारतात १३.३ कोटी आणि जगभरात २१ कोटींची कमाई केली आहे. जॉन अब्राहम व्यतिरिक्त, चित्रपटात सादिया खतीब, रेवती, कुमुद मिश्रा आणि शरीब हाश्मी यांच्याही भूमिका आहेत. फॉरच्यून पिक्चर्स, वकाऊ फिल्म प्रॉडक्शन, टी सीरिज आणि जेए एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.