जयदीप अहलावतनं मनोज वाजपेयींच्या पाया पडून घेतला आशीर्वाद, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:15 IST2025-11-09T11:14:41+5:302025-11-09T11:15:58+5:30
अभिनेता जयदीप अहलावतने मनोज वाजपेयींच्या चरणांना स्पर्श केल्याचे दिसून आले.

जयदीप अहलावतनं मनोज वाजपेयींच्या पाया पडून घेतला आशीर्वाद, Video व्हायरल
बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'द फॅमिली मॅन ३'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 'द फॅमिली मॅन ३' हा सीझन या महिन्यात २१ नोव्हेंबर पासून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. या सीझनमध्ये जयदीप अहलावत आणि मनोज वाजपेयी यांच्यातील संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, पण ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये मात्र या दोन दिग्गजांमधील प्रेम आणि आदर पाहायला मिळालं. या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात जयदीप अहलावतने मनोज वाजपेयींच्या चरणांना स्पर्श केल्याचे दिसून आले.
स्टेजवर एकत्र येताच, जयदीपने कोणताही विचार न करता वाकून मनोज यांचे चरण स्पर्श केले आणि आदर व्यक्त केला. यावर लगेचच मनोज यांनी त्याला मिठी मारली. दोघेही एकमेकांच्या पाठीवर थाप मारून हसत आणि गप्पा मारताना दिसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी जयदीप आणि मनोज यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
मनोज वाजपेयी हे अष्टपैलू अभिनेते आहेत. त्यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. गेल्या काही वर्षांमध्ये मनोज यांनी बॉलिवूडमध्ये विविध सिनेमांमध्ये काम करुन स्वतःचं एक स्थान निर्माण केलंय. त्यामुळे युवा पिढीतील कलाकारांना मनोज यांच्याबद्दल आदर वाटणं साहजिक आहे. मनोज हे जयदीप अहलावतपेक्षा ११ वर्षांनी मोठे आहेत.
'गँग्स ऑफ वासेपूर' ते 'फॅमिली मॅन ३'
जयदीप आणि मनोज यांनी यापूर्वी सुपरहिट चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये एकत्र काम केले आहे. आता 'द फॅमिली मॅन ३' मध्ये ते पुन्हा एकत्र येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या सीरिजमध्ये जयदीप अहलावत आणि मनोज यांच्यासह प्रियामणी, शारिब हाश्मी, वेदांत सिन्हा, श्रेया धनवंतरी, निम्रत कौर आणि गुल पनाग हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.