'लाज वाटायला लागली होती...' 'मस्ती' फ्रँचायझीबद्दल विवेक ओबेरॉयचा खुलासा, ॲडल्ट कॉमेडीवर दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:52 IST2025-09-29T16:51:21+5:302025-09-29T16:52:53+5:30
Vivek Oberoi: लवकरच विवेक ओबेरॉय 'मस्ती' फ्रँचायझीच्या चौथ्या भागात दिसणार आहे. यानिमित्तने 'मस्ती' फ्रँचायझीबद्दल त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'लाज वाटायला लागली होती...' 'मस्ती' फ्रँचायझीबद्दल विवेक ओबेरॉयचा खुलासा, ॲडल्ट कॉमेडीवर दिली प्रतिक्रिया
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हिंदी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. विनोदी भूमिकेपासून ते खलनायकाची भूमिका तो पडद्यावर उत्तम साकारतो. विवेकच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपटांचा उल्लेख करायचा झाल्यास, त्यात 'मस्ती' या चित्रपटाचा समावेश होतो. लवकरच विवेक 'मस्ती' फ्रँचायझीच्या चौथ्या भागात दिसणार आहे. यानिमित्तने 'मस्ती' फ्रँचायझीबद्दल त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख आणि आफताब शिवदासानी यांची ही त्रिकुटाची जोडी पहिल्यांदा २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मस्ती' चित्रपटात एकत्र दिसली होती. सध्या या तिघांचे वय अनुक्रमे ४९, ४६ आणि ४७ वर्षे आहे. केवळ प्रौढ प्रेक्षकांसाठी असलेल्या 'मस्ती' फ्रँचायझीचा विस्तार याच त्रिकुटासह २०१३ आणि २०१६ मध्ये 'ग्रँड मस्ती' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती'च्या रूपात करण्यात आला. अशा परिस्थितीत, एक वेळ अशी आली की, वयाच्या या टप्प्यावर या तिन्ही कलाकारांना आपल्या या चित्रपटाबद्दल 'लाज वाटायला लागली' होती. आता ही त्रिकुटाची जोडी 'मस्ती ४' या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहे.
याबद्दल बोलताना विवेक म्हणाला की, "मागील 'मस्ती' प्रदर्शित होऊन नऊ वर्षे झाली आहेत. आम्ही तिघे (रितेश, विवेक आणि आफताब) एका वेळी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो, जिथे आम्हाला या चित्रपटाबद्दल आणि त्यात आम्ही जे करत आहोत, त्याबद्दल 'लाज वाटायला लागली' होती. हे सगळं करण्याचं आमचं काय वय आहे? नुकतंच, मी 'मस्ती ४' च्या सेटवर जाणूनबुजून सगळ्यांची फिरकी घेत विचारले की, पहिली 'मस्ती' २१ वर्षांपूर्वी आली होती, तेव्हा 'मस्ती ४' मधील आमच्या अभिनेत्री काय करत असतील? तेव्हा त्या कदाचित 'डायपर घालण्याच्या' वयाच्या असतील."
'मस्ती ४' कधी प्रदर्शित होणार?
नुकताच ॲडल्ट कॉमेडी 'मस्ती ४'चा नवीन टीझर रिलीज करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर चाहत्यांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. 'मस्ती ४' च्या रिलीज डेटबद्दल सांगायचं झाल्यास हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळेस चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान इंद्र कुमार यांच्या हातून मिलाप जावेरी यांच्या हातात आली आहे.