नृत्य दिग्दर्शन करताना मी कलावंतच असते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 18:05 IST2016-11-12T18:05:25+5:302016-11-12T18:05:25+5:30
वीरेंद्रकुमार जोगी नृत्य म्हणजे मानवी भावनांचा आनंदोत्सव म्हणायला हवा. मर्यादा व समाजाची बंधने तोडल्याचा आनंद व्यक्त करताना आपण कशा ...

नृत्य दिग्दर्शन करताना मी कलावंतच असते...
नृत्य म्हणजे मानवी भावनांचा आनंदोत्सव म्हणायला हवा. मर्यादा व समाजाची बंधने तोडल्याचा आनंद व्यक्त करताना आपण कशा हालचाली करतोय, आपण कसे दिसतोय याचा विचारच कधी कुणी नृत्य करताना दिसत नाही. मग तो लग्नात केलेला डान्स असो किंवा पार्टीत. आपल्या अव्यक्त भावनांना व्यक्त करण्याची संधी म्हणजे नृत्य. बॉलिवूडमधील चित्रपटात नृत्य नसण्याची कल्पना करताच येत नाही, अनेक दिग्गज नतर्कांनी आपला नृत्याविष्कार चित्रपटात सादर केला आहे. बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शकाच्या नव्या पिढीतील मानसी अग्रवाल हिची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. तिने ‘वजनदार’ या मराठी चित्रपटातील पार्टी साँगची कोरिओग्रॉफी केली आहे. या निमित्ताने तिने सीएनएक्सशी संवाद साधला. डान्स कोरिओग्रॉफ करताना मी स्वत:च अॅक्टर असते असे ती म्हणाली.
प्रश्न : दिल्ली ते बॉलिवूड हा प्रवास कसा सुरू झाला?
मानसी : मी लहानपणापासूनच कथ्थक शिकत होते. यानंतर आठ वर्षे मी कथ्थक शिकवित होते. आमच्या कॉलेजमध्ये एक डान्स शो आयोजित करण्यात आला होता. तेथे अनुराग कश्यप आले होते. त्यांनी माझा या शोमधील डान्स पाहिला आंिण मला ‘गुलाल’ या चित्रपटासाठी कोरिओग्रॉफी करण्याची आॅफर केली. संधी माझ्याकडे चालून येत होती तिला सोडण्याचा प्रश्नच नव्हता.
प्रश्न : चित्रपटात नृत्य दिग्दर्शन करायचे असेल तर शास्त्रीय नृत्य शिकणे गरजेचे आहे का?
मानसी : नृत्य शिकण्याची गरज आहेच, मग तो कोणताही असो. हिप-हाप, कॉन्टेंप्ररी शिकूनही करता येते, मात्र क्लासिकलची थिअरी फार मोठी आहे. कोणत्याही डान्समध्ये तुम्ही पारंगत असाल तर काम करणे खूप सोपे असते.
प्रश्न : सुनो ना संगेमरमर या गाण्यामुळे तुला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ताजमहल मागे असताना गाण्याचे दिग्दर्शन करणे हा कसा अनुभव होता?
मानसी : ताजमहल अत्यंत सुंदर आहे, तुम्ही दिवसभर नुसते उभे राहून त्याला पाहू शकता. सुनो ना संगेमरमर या गाण्यात डान्सही नव्हता, ते गाणेच दिग्दर्शित करायचे होते. शब्द व भावनांचा मेळ मला कलाकारांच्या वागण्यातून दाखवायचा होता. यामुळे तेथे कोरिओग्राफरची गरज होती. हे माझे पहिले रोमाँटिक गाणे होते. मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा मी येथे गाणे शूट करणार आहे हेच विसरले होते. ताजमहलचे सौंदर्य तुम्हाला आपल्या विश्वाची निर्मिती करायला लावणारे आहे. ताजच्या प्रेरणेतूनच या गाण्याला मी आणखी सुंदर करू शकले. अॅक्टर्सच्या बाबतीतही असेच काही होते. ताजमहलसमोर चित्रीत करण्यात आलेले ते पहिले गाणे होते.
प्रश्न : हिंदी चित्रपटात काम करताना अचानक मराठी चित्रपटात कशी काय आलीस?
मानसी : सचिन कुंडलकरसोबत मी यापूर्वी ‘अय्या’ या चित्रपटात काम केले होते. त्याने मला ‘वजनदार’बद्दल विचारले. मी यापूर्वी कधीच मराठीत काम केले नव्हते, पण सचिनने मला सांगितले की हे पार्टी साँग आहे. हिंदी इंग्रजी व मराठी या तिन्ही भाषा त्यात आहे, यामुळे मी त्याला होकार दिला. सई व प्रिया सोबत काम करताना मजा आली. दोघीही आपल्या कामाप्रती सिन्सिअर आहेत. आम्ही जे गाणे करणार होतो, त्यात दोघीही आपली बंधने तोडून आल्या आहेत. त्यांच्या मनात कुणाची भीती नाही. त्या एन्जॉय करीत असल्याचे दाखवायचे होते. अनेक मुली आपले जीवन जगू इच्छितात. त्यांना कॅप्चर करणे माझ्यासाठी नवे होते. या गाण्यात मला फार मजा आली. हे गाणे खास आहेच ते तुम्ही पाहिल्यावर कळेलच.
प्रश्न : महाराष्ट्रातील लावणी, तमाशा याबद्दल तुला काय वाटते?
मानसी : महाराष्ट्रात लावणी व तमाशाबद्दल फार उत्सुकता असते, तमाशा आता कमी झालाय. पण लावणी कायम असल्याचे दिसते. जेव्हा मी स्टेज करीत होते. तेव्हा अनेकदा लावणी केली आहे. रंगतदार गाणे म्हणजे लावणी, पण आता लावणी त्याच्या मूळ रूपापासून थोडी बाजूला झाली आहे असे वाटू लागलेय. आजही लावणीला जर मूळ रुपात दाखविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याची पुन्हा प्रसंशा होईल.
प्रश्न : तू एक स्क्रीप्ट लिहित असून, लवकरच दिग्दर्शन करणार आहेस असे ऐकण्यात आहे, खरं आहे का?
मानसी : (हसत हसत) दिग्दर्शनाबाबत माझा विचार सुरू आहे. मी स्क्रीप्ट लिहतेय, मात्र अजून पूर्ण झाली नाही. हे कसे होतेय मला कळत नाही....पण मी एक चांगला चित्रपट तयार करण्याचा विचार करीत आहे, पण सध्या फक्त लिखाणाचे काम सुरू आहे.
प्रश्न : सध्या टीव्हीवर अनेक डान्स रिआलिटी शो सुरू आहेत. अनेक डान्सर यात चांगले नृत्य करताना दिसतात; मात्र ते आपले स्थान निर्माण करू शकत नाही असे का होत असावे?
मानसी : डान्स रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांचा फोकस डान्सच्या शारीरिक हालचालींवर दिसतो. डान्स केवळ शारीरिक नाही. त्यात ‘हार्ट अँड सोल’ या दोन्ही गोष्टी असायला हव्या. डान्स मनातून यायला हवा. तरच त्याच्या डान्सला लोक पसंत करतील. ते यशस्वी होतील. पार्टी साँग असो किंवा रोमँटिक गाणे असो मी त्याला अनुभवण्यावर विश्वास ठेवते. डान्स करताना मी अॅक्टर काय विचार करेल हे मनात आणते, किंबहुना मी त्यावेळी अॅक्टरच असते.