हृतिक रोशनची नवी इनिंग, अभिनेता नव्हे, तर 'प्रोड्यूसर' म्हणून ओटीटीवर करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:19 IST2025-10-10T18:18:15+5:302025-10-10T18:19:39+5:30
Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे तो 'क्रिष ४'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याची तयारी करत असताना, दुसरीकडे लवकरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करत आहे.

हृतिक रोशनची नवी इनिंग, अभिनेता नव्हे, तर 'प्रोड्यूसर' म्हणून ओटीटीवर करणार पदार्पण
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे तो 'क्रिष ४'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्याची तयारी करत असताना, दुसरीकडे लवकरच तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पदार्पण करत आहे. मात्र, त्याची ही इनिंग अभिनेता म्हणून नसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओने नुकतेच एका नवीन ओरिजिनल ड्रामा सीरिज 'स्टॉर्म'ची घोषणा केली आहे. या प्रोजेक्टसाठी हृतिक रोशन आणि त्यांची कंपनी HRX फिल्म्स यांनी हातमिळवणी केली आहे.
जरी या सीरिजचे नाव अद्याप निश्चित झालेले नसले तरी, त्याला तात्पुरते 'स्टॉर्म' नाव देण्यात आले आहे. ही सीरिज अजीतपाल सिंग यांनी बनवली आणि दिग्दर्शित केली आहे. तर कथा अजीतपाल सिंग यांनी फ्रांस्वा लुनेल आणि स्वाती दास यांच्यासोबत मिळून लिहिली आहे. हृतिक रोशन आणि ईशान रोशन या सीरिजचे निर्माते आहेत. 'स्टॉर्म'मध्ये उत्कृष्ट कलाकारांची टीम दिसणार आहे. यामध्ये पार्वती थिरुवोथू, आलिया एफ, सृष्टी श्रीवास्तव, रमा शर्मा आणि सबा आझाद प्रमुख भूमिकेत असतील. लवकरच या सीरिजच्या प्रॉडक्शनचे काम सुरू होणार आहे. ही सीरिज मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित एक रोमांचक थ्रिलर ड्रामा असणार आहे.
हृतिक रोशन म्हणाला...
निर्माता म्हणून आपल्या ओटीटी प्रवासावर बोलताना हृतिक रोशन म्हणाला, 'स्टॉर्म'ने मला निर्माता म्हणून ओटीटीच्या जगात पदार्पण करण्याची एक उत्कृष्ट संधी दिली आहे. अजीतपाल यांनी निर्माण केलेले हे रंजक आणि सत्यतेने भरलेले जग मला या सीरिजकडे आकर्षित करणारे ठरले. कथा सखोल, दमदार आणि अविस्मरणीय पात्रांनी भरलेली आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे.