'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरच्या पत्नीचा 'हक' ओटीटीवर प्रदर्शित, आहे सत्य घटनेवर आधारित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:03 IST2026-01-02T17:01:41+5:302026-01-02T17:03:20+5:30
'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरच्या पत्नीचा 'हक' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरच्या पत्नीचा 'हक' ओटीटीवर प्रदर्शित, आहे सत्य घटनेवर आधारित!
काही चित्रपटाच्या कथा अशा असतात, ज्या केवळ मनोरंजन करत नाहीत, तर समाजाच्या डोळ्यांत अंजन घालतात. असाच एक चित्रपट म्हणजे 'हक'. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'हक' हा चित्रपट आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर धडकला आहे. दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा कोर्टरूम ड्रामा आता घरबसल्या पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे.
२ तास १६ मिनिटांचा हा चित्रपटअभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या दमदार अभिनयानं सजलेला आहे. सुपन वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट एका अत्यंत वादग्रस्त आणि ऐतिहासिक खटल्यावर आधारित आहे. 'हक' या चित्रपटाची कथा शाह बानो बेगम यांच्या वास्तविक जीवनातील संघर्षापासून प्रेरित आहे. शाह बानो या इंदूरच्या एक घटस्फोटित मुस्लिम महिला होत्या. ज्यांनी १९८५ च्या 'शाह बानो खटला'मध्ये सर्वोच्च न्यायालयात पोटगीसाठी लढा दिला होता.
७ नोव्हेंबर २०२५ रोजी 'हक' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, प्रदर्शनापूर्वीच त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता. शाह बानोच्या कायदेशीर वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. हा कोर्टरूम ड्रामा मुस्लिमांच्या भावना दुखावतो, असा त्यांचा दावा होता. अनेक कायदेशीर अडचणी असूनही हा चित्रपट प्रदर्शित झाला. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे.