नीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 14:52 IST2019-07-10T14:46:49+5:302019-07-10T14:52:59+5:30
नीतू सिंग यांनी नुकतीच अन्नू कपूर यांच्या सुहाना सफर विथ अन्नू कपूर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात ऋषी आणि त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले.

नीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत
नीतू सिंग कपूर आणि ऋषी कपूर यांना बॉलिवूडमधील एक क्यूट कपल मानले जाते. त्यांना रिधिमा आणि रणबीर अशी दोन मुले आहेत. रणबीर सध्या त्याच्या आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून अभिनयक्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहे. ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी असून अमेरिकेत उपचार घेत आहेत. आता त्यांची तब्येत सुधारत असून ते लवकरच भारतात परतणार आहेत.
नीतू सिंग यांनी नुकतीच अन्नू कपूर यांच्या सुहाना सफर विथ अन्नू कपूर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात ऋषी आणि त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, ऋषीसोबतची माझी पहिले भेट ही अतिशय वाईट होती. त्याला लोकांना सतवायला खूप आवडते. मी त्याला पहिल्यांदा भेटले, त्यावेळी त्याने माझ्या कपड्यांवर आणि मेकअपवर अतिशय वाईट टिप्पणी केली होती. त्यामुळे मी खूप चिडले होते. तो नेहमीच मला कोणत्या ना कोणत्या कारणाने चिडवायचा. मी त्यावेळी खूपच लहान असल्याने मला प्रचंड राग यायचा.
नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांनी अमर अकबर अँथोनी, खेल खेल में, कभी कभी यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याविषयी नीतू यांनी सांगितले, बॉबी या चित्रपटानंतर डिम्पल कपाडियाचे लग्न झाले आणि ती वगळता त्या काळातील सगळ्याच अभिनेत्री ऋषीपेक्षा खूप मोठ्या दिसत होत्या. त्यामुळे ऋषीसोबतचे सगळे चित्रपट मला ऑफर व्हायला लागले.
ऋषी आणि नीतू यांनी लग्न करण्याविषयी कधी निर्णय घेतला याविषयी नीतू यांनी सांगितले, ऋषीसोबत लग्न करण्याचा निर्णय कधी घेतला तो क्षण माझ्या लक्षात नाही. पण त्यावेळात मी अनेक चित्रपट साईन केले होते. माझे आणि ऋषीचे अफेअर सुरू असले तरी माझी आई माझ्याबाबत खूप प्रोटेक्टिव्ह होती. ती माझी बहीण लव्हलीला माझ्या आणि ऋषीच्या डिनर डेटला पाठवत असे. तीन वर्षं असेच सुरू होते.
मी नसीब, शान यांसारखे चार-पाच बिग बजेट चित्रपट साईन केले होते. त्यावर ऋषीने मला विचारले होते की, तू इतके चित्रपट साईन करत आहेस... तुला माझ्याशी लग्न करायचे नाही का? हे ऐकून मी प्रचंड खूश झाले होते आणि मी जे चित्रपट साईन केले होते, त्यांचे सगळ्यांचे पैसे परत केले. तसेच ज्या चित्रपटांचे मी चित्रीकरण करत होती, त्या सगळ्यांचे चित्रीकरण केवळ एका वर्षांत पूर्ण केले. मी पंधरा वर्षं सतत काम करत असल्याने लग्नानंतर मी काही वर्षं काम केले नाही.