आईच्या कडेवर असलेल्या चिमुकलीला बनायचे होते IPS ऑफिसर, आज आहे बॉलिवूडची 'टॉप हिरोईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 10:52 AM2023-03-05T10:52:56+5:302023-03-05T10:54:51+5:30
आईच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओळखले का ?
आईच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओळखले का ? आज हीच मुलगी बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. याशिवाय तिला तिच्या साधेपणाने ओळखले जाते. ग्लॅमरच्या दुनियेत ही सुंदर अभिनेत्री साध्या राहणीमानाला प्राधान्य देते. एका प्रसिद्ध ब्युटी ब्रॅंडच्या जाहिरातीतून ती घराघरात पोहोचली आणि टॉपची हिरोईन बनली. हा तिचा लहानपणीचा फोटो आहे. ही अभिनेत्री म्हणजेच यामी गौतम. (Yami Gautam)
यामी मूळची हिमाचल प्रदेशच्या बिलासपुरची आहे. ती चंदीगढमध्ये लहानाची मोठी झाली. यामीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी फिल्म दिग्दर्शक आहेत. २० वर्षांची असताना तिने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिला एका प्रसिद्ध ब्यूटी ब्रॅंडची जाहिरात मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने टीव्ही मालिका 'चॉंद के पार चलो' मधून अभिनयाला सुरुवात केली. दोन वर्ष छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर तिने सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. हिंदी नाही तर तिने कन्नड सिनेमामधून अभिनयात पदार्पण केले. २०१२ साली आलेल्या विकी डोनर सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. पहिल्याच सिनेमातून तिला यश आले.
यामीला बनायचे होते आयएएस ऑफिसर
घरात फिल्मी वातावरण असतानाही यामीला मात्र आयपीएस (IPS) होण्याची इच्छा होती. UPSC परिक्षा देऊन ती ऑफिसर होण्याचे स्वप्न बघत होती. मात्र तिचं नशीबच तिला अभिनयात घेऊन आलं.
यामीने 'विकी डोनर' नंतर काबिल, सनम रे, उरी, दसवी या सिनेमातही भूमिका केल्या. 4 जून २०२१ मध्ये तिने दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) सोबत लग्नगाठ बांधली. चंदीगढमध्येच अगदी साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ती लग्नबंधनात अडकली.