वादाच्या भोवऱ्यात अडकला 'गंगूबाई काठियावाडी', दिग्दर्शक आणि आलियावर खटला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 14:52 IST2020-12-23T14:52:02+5:302020-12-23T14:52:42+5:30
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा त्यांचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'मुळे चर्चेत आले आहेत.

वादाच्या भोवऱ्यात अडकला 'गंगूबाई काठियावाडी', दिग्दर्शक आणि आलियावर खटला दाखल
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा त्यांचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'मुळे चर्चेत आले आहेत. संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट दमदार असतात पण बऱ्याचदा ते वादाच्या भोवऱ्यात अडकतात. आता असे वृत्त समोर आले आहे की त्यांचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' मेकिंगदरम्यान वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. खरेतर चित्रपटावर गंगूबाईच्या कुटुंबाने आक्षेप घेत मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन जैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भटच्या विरोधात २२ डिसेंबरला खटला दाखल केला आहे.
या प्रकरणावर ७ जानेवारी, २०२१ पर्यंत तिघांना जबाब नोंदवण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. हुसैन जैदीचे पुस्तक 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई'मध्ये गंगूबाईची कहाणी आहे आणि याच पुस्तकावर आधारीत संजय लीला भन्साळी नवीन चित्रपटाची निर्मिती करत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील फिल्मसिटीमध्ये होत आहे. शूटिंगसाठी सेट डिझायनिंगसाठी जवळपास साडे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
'गंगूबाई काठियावाडी' सिनेमात डॉन गंगूबाईची कथा दाखवण्यात आली आहे आणि चित्रपटात आलिया भट डॉनच्या भूमिकेत आहे. गंगूबाई साठच्या दशकात मुंबई माफियाचे नाव मोठे होते. असे सांगितले जाते की तिच्या नवऱ्याने तिला फक्त ५०० रुपयांसाठी विकले होते. त्यानंतर ती वेश्या व्यवसायात रुळली होती.
'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट स्त्री केंद्रीत आहे आणि या चित्रपटाची कहाणी आलिया भटच्या अवतीभवती फिरते. या चित्रपटात अजय देवगणदेखील केमिओ करताना दिसणार आहे.