“सलमानच्या हिट अँड रन केसमुळे चित्रपट फ्लॉप ठरला”, ‘गदर २’ फेम अमीषा पटेलचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 01:23 PM2023-08-23T13:23:08+5:302023-08-23T13:25:24+5:30
'गदर २' फेम अमीषा पटेलने 'ये है जलवा'च्या अपयशाबाबत बोलताना सलमान खानच्या हिट अँड रन केसचा उल्लेख केला.
२००१ साली प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारत-पाकिस्तानमधील तारा सिंग आणि सकीना या दोन प्रेमीयुगुलांची गोष्ट या चित्रपटातून दाखविण्यात आली होती. तब्बल २२ वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सनी देओलने तारा सिंग तर अभिनेत्री अमीषा पटेलने सकीना ही व्यक्तिरेखा साकारली आहे. गदर २ चित्रपटाच्या निमित्ताने अमीषा सध्या अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. यातीलच एका मुलाखतीत अमीषाने तिचा एक चित्रपट सलमान खानमुळे फ्लॉप ठरल्याचं म्हटलं आहे.
अमीषाच्या सुपरहिट चित्रपटांच्या लिस्टमध्ये 'कहो ना प्यार है', 'गदर', 'हमराज' असे मोजकेच सिनेमे आहेत. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण, तिचे फारच कमी चित्रपट लोकप्रिय ठरले. 'गदर'च्या यशानंतर अमीषा २००२ साली प्रदर्शित झालेल्या 'ये है जलवा' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. परंतु, हा चित्रपट फारसा चालला नाही. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अमीषाने चित्रपट फ्लॉप ठरण्यामागंच कारण सांगत सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाचा उल्लेख केला.
अमीषा म्हणाली, “ये हे जलवा हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्या चांगल्या चित्रपटांपैकी एक आहे. सलमान कोणत्याच चित्रपटात एवढा हँडसम दिसला नव्हता. या चित्रपटाचं म्युझिकही चांगलं होतं. पण, सलमानच्या हिट अँड रन केसचा परिणाम चित्रपटावर झाला. कारण, तेव्हा प्रेक्षक आवडत्या कलाकाराबाबत अशा गोष्टी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे ये है जलवा चित्रपटाकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर तेव्हा प्रेक्षक सजग असते, तर या चित्रपटाने चांगली कमाई केली असती.”
“माझ्या सासूचं लग्न”, सिद्धार्थच्या आईसाठी मितालीची खास पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो...”
सलमान खान आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असलेला ‘ये है जलवा’ चित्रपट ३ जुलै २००२ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर काही दिवसांनीच सलमानचं हिट अँड रन प्रकरण समोर आलं होतं. यामध्ये फुटपाथवरील एका व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला होता. तर अन्य काही जण जखमी झाले होते. याप्रकरणी सलमानला अटकही झाली होती. हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं.