फरदीन खानला वजन वाढल्यावरून करण्यात आलेल्या ट्रोलवर अनेक महिन्यांनी दिले त्याने हे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 17:59 IST2019-04-18T17:56:16+5:302019-04-18T17:59:29+5:30
फरदीन गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता.

फरदीन खानला वजन वाढल्यावरून करण्यात आलेल्या ट्रोलवर अनेक महिन्यांनी दिले त्याने हे उत्तर
फरदीन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यावेळी त्याच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. त्याची बॉलिवूडमधील ओळख ही चॉकलेट हिरोची होती. त्याच्या दिसण्यावर अनेक मुली फिदा व्हायच्या. फरदीन हा अतिशय फिट हिरो होता. पण नंतरच्या काळात त्याने त्याच्या फिटनेसकडे लक्षच दिले नाही.
काही वर्षांपूर्वी तर त्याचे वजन चांगलेच वाढले होते. फरदीन इतका गोलमटोल झाला होता की, त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते. फरदीनचा हा लूक त्याच्या चाहत्यांसाठी निश्चितपणे धक्कादायक होता. हा खरंच फरदीन आहे का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला होता. त्याच्या या लूकवर सोशल मीडियाद्वारे अनेकांनी टिंगल देखील उडवली होती.
फरदीन गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या दुल्हा मिल गया या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. तो बॉलिवूडच्या पार्टींपासून, पुरस्कार सोहळ्यांपासून देखील दूर राहातो. त्यामुळे फरदीनची झलक कित्येक महिन्यांपासून पाहायला मिळालेली नव्हती. पण नुकतीच फरदीनने त्याची चुलत बहीण फराह खानच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याचे वजन पहिल्यापेक्षा कमी झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्याने मीडियाशी गप्पा देखील मारल्या. त्याच्या वजनावरून सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती त्याचा त्याला प्रचंड राग आला होता असे त्याने यावेळी सांगितले. याविषयी मीडियाशी बोलताना फरदीन म्हणाला, मला माझ्या वजनामुळे अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते. लोक अशाप्रकारच्या विचारसरणीतून कधी बाहेर येणार हेच मला कळत नाही. खरे तर मला ते काय म्हणतात याचा फरक पडत नाही. मी रोज मला आरशात पाहातो. मी जसा आहे, तसा आहे. त्यामुळे मी सध्या माझ्याविषयी लोकांनी, मीडियानी लिहिलेले वाचणेच सोडले आहे.
चित्रपटसृष्टीत कधी कमबॅक करणार याविषयी विचारले असता फरदीनने सांगितले की, मला पुन्हा अभिनय करायचा आहे. पण त्याचसोबत मला चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करायचे आहे आणि त्यावर मी सध्या काम करत आहे. मी लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेन.