'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:04 IST2025-11-07T18:02:40+5:302025-11-07T18:04:24+5:30
शूटच्या २ आठवडे आधी हिरोईनने सिनेमा सोडला, फराह खानने सांगितली ती घटना

'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
फराह खान दिग्दर्शित 'मै हूँ ना' सिनेमा सुपरहिट होता. शाहरुख खानने यामध्ये मेजरची भूमिका साकारली होती. तर सुश्मिता सेन एका सुंदर शिक्षिकेच्या भूमिकेत होती. अमृता राव आणि झायेद खान यांचीही जोडी सिनेमात दिसली. 'चले जैसे हवाए सनन सनन' हे अमृता रावचं गाणं आजही कुठे ना कुठे वाजतं. पण नुकतंच फराह खानने एक खुलासा केला आहे. अमृताच्या जागी आधी ही भूमिका आयेशा टाकियाला ऑफर झाली होती. मात्र आयेशाने सिनेमाला नकार दिला होता.
फराह खान तिच्या युट्यूब चॅनलवरील शोसाठी नुकतीच अमृता रावच्या घरी गेली होती. तेव्हा दोघींनी 'मै हूँ ना' सिनेमाला उजाळा दिला. यावेळी फराह खान खुलासा करत म्हणाली, "सिनेमाचं शूट सुरु होण्याच्या फक्त २ आठवडे आधी हिरोईनने सिनेमातून काढता पाय घेतला होता. सिनेमाचं शूट कन्फर्म होतं आणि २ आठवडे आधी सिनेमाची अभिनेत्रीच ठरलेली नव्हती. दार्जिलींगमधील सेंट पॉल बुक केलं होतं आणि तिथे सगळे आधीच पोहोचलेही होते. आम्ही आधी आयेशा टाकियाला साईन केलं होतं पण ती इम्तियाज अलीचाच सिनेमा शूट करत राहिली. २ आठवडे राहिले होते आणि मी तिला फोन केला की तुझे अजून कॉस्च्युम ठरले नाहीयेत तेव्हा ती म्हणाली की 'मी येऊ शकत नाही, इम्तियाज सरांचं शूट अजूनही संपलेलं नाही.'
अमृताची कशी झाली एन्ट्री?
फराह पुढे म्हणाली, "मग गौरी खान मला म्हणाली की या मुलीला एकदा बघ. तो अमृताचा फोटो होता. मला काही ती माझ्या कॅरेक्टरसाठी योग्य वाटली नाही कारण तिने कुर्ता घातला होता. मी तिला सिनेमातील मुख्य रडण्याचा सीन दिला. अमृताचं असं आहे की ती कॅमेऱ्यासमोर फायर असते आणि रिअल मध्ये एकदम नॉर्मल राहते. श्रीदेवीमध्येही हाच गुण होता."
अमृता रावच्या करिअरमध्ये 'मै हूँ ना' चित्रपट महत्वाचा ठरला. आजही तिला सिनेमातील संजना बक्षीच्या भूमिकेमुळे ओळखलं जातं. अमृता नुकतीच 'जॉली एलएलबी ३'मध्ये दिसली.