"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:44 IST2025-12-28T16:43:23+5:302025-12-28T16:44:47+5:30
इम्रान हाश्मीची क्रश ती आज नॅशनल क्रश... निर्मात्या असं काय म्हणाल्या वाचा

"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
गिरीजा ओक हे नाव सध्या मराठीच नाही तर हिंदीतही गाजत आहे. एका मुलाखतीमुळे गिरीजा ओक नॅशनल क्रश बनली. हिंदीतील बहुतांश लोकांना तिची नव्याने ओळख झाली असली तरी मराठी प्रेक्षक तिला पूर्वीपासून ओळखतात. मराठी मालिका, सिनेमांमध्ये गिरीजा दिसली आहे. २००४ साली गिरीजा आणि स्वप्नील जोशीचा 'मानिनी' हा सिनेमा आला होता. त्या सिनेमाच्या शूटनंतर गिरीजा दुबईवरुन भारतात येत असताना विमानात चक्क इम्रान हाश्मी तिच्याकडे पाहत होता. याचा किस्सा दिग्दर्शिका, निर्मात्या कांचन धर्माधिकारी यांनी सांगितला.
'तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीत कांचन धर्माधिकारी म्हणाल्या, "२००४ साली मी 'मानिनी' पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. आम्ही तीन निर्माते होतो. तिघांनी मिळून पैसे जमवले आणि मानिनी केला. तो पहिलाच मराठी सिनेमा आहे ज्याचं परदेशात शूट झालं. आम्ही दुबईला १२ दिवसांचं शूट केलं होतं. गिरीजा ओक जी आता तुमची नॅशनल क्रश आहे ती तेव्हा सिनेमा होती. आम्ही दुबईवरुन येत होतो तेव्हा विमानात इम्रान हाश्मी होता. तो मर्डर सिनेमाचं शूटिंग करुन येत होता. गिरीजा तर तेव्हा कॉलेजमध्ये होती. तेव्हा तिचे सरळ लांबसडक केस होते. तजेलदार त्वचा, दिसायला अतिशय सुंदर होती. आजही आहेच. नॅशनल क्रश ती होणारच होती कारण तेव्हा इम्रान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता. त्यामुळे इम्रान हाश्मीची क्रश ती नॅशनल क्रश होणारच ना! माझ्या असिस्टंटने येऊन मला सांगितलं की,'मॅडम, बघा तो तिच्याकडे पाहतोय'."
त्या पुढे म्हणाल्या, "पण आज मला तिचं नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेलं पाहिलं आणि त्यावरच्या कमेंट्स वाचून मला वाईट वाटलं. मराठी माणूस आधी पाय खेचण्यातच उस्ताद असतो. अरे तुम्ही तिने आधी काय काय काम केलंय, स्ट्रगल केलाय ते बघा. तिचं गौहर जान काय सुंदर नाटक आहे. तिने कधीच चुकीचं काही केलं नाही. अंगप्रदर्शन करुन तिने कधीच प्रसिद्धी मिळवली नाही. तुम्ही तिचं कौतुक केलं पाहिजे. आपली मराठी मुलगी त्या स्टेजवर पोहोचलीये त्याची स्तुती करा."