आॅडिशनशिवाय डबिंग आर्टिस्टला काम मिळत नाही :​ मेघना एरंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 17:22 IST2016-12-09T17:22:15+5:302016-12-09T17:22:15+5:30

-रूपाली मुधोळकर हॅरी पॉटर सीरिजपासून निंजा हतोडी, नॉडी अशा अनेक कार्टुन कॅरेक्टर्सला आपला आवाज देणारी मेघना एरंडे हे सिनेसृष्टीतील ...

Dubbing artist is not available without audition: Meghna Erande | आॅडिशनशिवाय डबिंग आर्टिस्टला काम मिळत नाही :​ मेघना एरंडे

आॅडिशनशिवाय डबिंग आर्टिस्टला काम मिळत नाही :​ मेघना एरंडे

-र
ूपाली मुधोळकर

हॅरी पॉटर सीरिजपासून निंजा हतोडी, नॉडी अशा अनेक कार्टुन कॅरेक्टर्सला आपला आवाज देणारी मेघना एरंडे हे सिनेसृष्टीतील एक चिरपरिचित व्यक्तिमत्त्व. डबिंग आर्टिस्ट म्हणून मेघनाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण केवळ एक डबिंग आर्टिस्टच नाही तर एक अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. मेघनाने नुकतीच लोकमतच्या नागपूर कार्यालयास भेट दिली. यावेळी तिच्यासोबत मारलेल्या या मोकळ्या गप्पा....


मेघना, एक यशस्वी डबिंग आर्टिस्ट आणि अभिनेत्री म्हणून लोक तुला ओळखतात. पण यापैकी कुठली ओळख तुला अधिक भावते?
- खरे तर केवळ डबिंग वा अ‍ॅक्टिंग इथपर्यंतच माझे काम मर्यादित नाही तर याशिवायही अनेक गोष्टी मी करते. गेल्या २७ वर्षांत मी अनेक भूमिकेत वावरते आहे. आज डबिंग करायचे, उद्या शूटींग करायचेयं,  परवा निवेदन करायचे आणि नेरवा एखादा लाईव्ह कार्यक्रम करायचायं. अशा अनेक भूमिकेत मी वावरते. याशिवाय मी एका मुलीची आई आहे. ती सुद्धा एक वेगळी भूमिका आहे. त्यामुळे लोक मला काय म्हणून ओळखतात यापेक्षा मला वेगवेगळ्या गोष्टी करताना मला आनंद मिळतो. मला त्याच त्या गोष्टी करण्याचा कंटाळा येत नाही, हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. शिवाय मी करत असलेल्या गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. म्हणजे माझा आवाज चांगला असेल तर माझ्या भूमिकेला अधिक बळ मिळतं. म्हणून या सगळ्या गोष्टी मी एन्जॉय करतेय.

आत्तापर्यंत तू शेकडो कार्टून कॅरेक्टर्सला आवाज दिलाय. या वेगवेळ्या पात्रांच्या तेवढ्याच वेगवेगळ्या धाटणीच्या, लयींच्या आवाजांची तयारी कशी करतेस?
- गेल्या अनेक वर्षांपासून मी आवाज देतेय. त्यामुळे आताश:माझ्या हे बरचं अंगवळणी पडलयं. पण अगदी आजही आॅडिशनशिवाय आम्हाला एकही कॅरेक्टर मिळत नाही. अनेकदा आम्हाला ब्रिफ दिलं जातं. मला हे ब्रिफ आल्यानंतर मी ते समजून घेते, त्या कॅरेक्टरचा स्वभाव, त्याच्या आवाजाचा पोत कसा राहू शकतो, हे सगळे आत्मसात करून मी तयारी करते.



तुझ्यातलं डबिंग आर्टिस्ट बनण्याच टॅलेंट तू कसं ओळखल? 
-हे श्रेय माझ्या आई-बाबांना जातं. आमच्या घरात अगदी पारंपरिक वातावरण होत. अभ्यास सर्वाधिक महत्त्वाचा असं एक तत्त्व होत. पण लहान असताना टीव्हीवरच्या एका जाहिरातील सगळ्या कॅरेक्टरचे मी अगदी हुबेहुब आवाज काढून दाखवायचे. माझ्या आईला तेव्हा माझ्यातलं हे टॅलेंट लक्षात आलं.  त्यांनी मला यासाठी प्रोत्साहन दिलं आणि विद्याताई पटवर्धन यांनी मला या क्षेत्रात आणलं.

  कॅरेक्टरला आवाज देताना, डबिंग आर्टिस्टला काही स्वातंत्र्य असत का?
-  तुमचा अनुभव पाहून तुमचा दिग्दर्शक वा पर्यवेक्षक तुम्हाला मोकळीक देत असतील तर ते चांगलेच. पण बहुतांश दिलेल्या चौकटीतच आम्हाला काम करावं लागतं. माझ्याबाबतीत विचारशील तर मला आताश: माझ्या सिनिअ‍ॅरिटीचा फायदा होऊ लागला आहे. मी चार-पाच प्रकारचे आवाज काढून दाखवते. मग तुम्हाला आवडेल ते सांगा, असा पर्याय मी आताश: दिग्दर्शकासमोर ठेवते. मला तेवढी मोकळीक मिळू लागली आहे. फक्त आपला आवाज त्या कॅरेक्टरचा स्वत:चा आवाज वाटावा. त्यात कुठलाही खोटेपणा दिसू नये, इतकी काळजी मी घेते.

सध्या तू कुठल्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेस?
-अगदी आत्ताच मी ‘मजाक मजाक में’मध्ये हा रिअ‍ॅलिटी शो संपवलाय. ‘दिल, दिमाग, बत्ती’ नावाचा चित्रपटही मी केलाय. ‘लाल इश्क’चे डबिंगही मी केले होते. निंजा हतौडीचे माझे नियमित डबिंग सुरु असतं. काही नवीन चित्रपटांचे आॅडिशन मी दिलेय.

तुझ्या भविष्यातील योजना काय?
-सध्या तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे(हसत हसत) मला माझे वजन कमी करायचेयं. गेल्या सहा वर्षांत घर, संसार, आईपण यामुळे माझ्या क्षेत्राकडे थोड दुर्लक्ष झालं होत. त्यामुळे मी आता माझ्या क्षेत्रावर पूर्णपणे फोकस करतेयं. याच क्षेत्रात वेगळे काही करता येईल का? हा माझा प्रयत्न आहे. यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहेत.

या क्षेत्रात येणा-यांना तू काय सल्ला देशील?
- हे एक वेगळं क्षेत्र आहे. यात फार नाव नाही. पण मेहनत मात्र तितकीच आहे. त्याला कुठलाही शॉर्टकट नाही. फेम नाही पण कष्ट घ्यायची तयारी असेल तर हे क्षेत्र चांगला पैसाही देऊ शकतं. डबिंग कलाकार व्हायचे निश्चित केल्यानंतर वेगवेगळ्या व्हॉईस एर्क्ससाईज शिका. गाणं शिका. याचे काही कोर्सेस आहेत. पण मी स्वत: ते केले नसल्याने मी त्याचा सल्ला देत नाही. माझ्यामते, प्रामाणिक प्रयत्न करा, यश आपोआप तुमच्या वाट्याला येईल.





Web Title: Dubbing artist is not available without audition: Meghna Erande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.