Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू

By संजय घावरे | Published: November 18, 2022 03:52 PM2022-11-18T15:52:35+5:302022-11-19T11:41:59+5:30

Drishyam 2 movie review अजय देवगणचा 'दृश्यम २' पाहण्याचा प्लान करत असला तर एकदा वाचा हा रिव्ह्यू.

Drishyam 2 Movie Review: Ajay Devgan starrer Drishyam 2 movie review | Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू

Drishyam 2 Movie Review: हिट की फ्लॉप? कसा आहे अजय देवगणचा 'दृश्यम २' सिनेमा, वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : अजय देवगण, तबू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशीता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर, सौरभ शुक्ला, नेहा जोशी, कमलेश सावंत, योगेश सोमण, शरद भुताडीया
दिग्दर्शक : अभिषेक पाठक
निर्माता : भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार
शैली : क्राईम थ्रीलर
कालावधी : दोन तास २० मिनिटे
दर्जा : चार स्टार 
चित्रपट परीक्षण: संजय घावरे


शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण शब्द मनात भ्रम निर्माण करतात, पण दृश्य कधीच खोटं बालत नाहीत, ते सत्य दाखवतात अशा आशयाचा संवाद या चित्रपटात आहे. पटकथा, संवाद आणि मांडणीच्या आधारे हे पटवून दिलं आहे. सर्व चित्रपटांमध्ये सत्याचा विजय आणि असत्याचा पराजय होतो, पण यात अगदी उलट घडूनही पाहणाऱ्याला त्यात काही वावगं वाटत नाही. हीच खरी दृश्यमची जादू आहे. सात वर्षांनी 'दृश्यम'चा दुसरा भाग पाहताना निशिकांत कामतची आठवण येते. निशी असता तरी त्यानंही असाच काहीसा चित्रपट बनवला असता. अभिषेक पाठकनं निशीचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे.

कथानक : विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची हि कथा आहे. ४ ऑक्टोबर २०१४ च्या रात्री घडलेल्या घटनेतील दुसरा ट्रॅक ओपन करत चित्रपटात रंगत आणली आहे. केबल चालवणाऱ्या विजयनं प्रगती केली आहे. घरासमोरील जमिन विकून थिएटर उभारलं आहे. तो चित्रपटाची निर्मितीही करत आहे. त्याची कथा त्यानं पुस्तक रूपात प्रकाशित केली आहे. सॅमची बाॅडी न मिळाल्यानं पोलिसांचं शोधकार्य सुरूच आहे. पोलीस कधीही पुन्हा येऊ शकतात हे माहित असल्यानं विजयही गाफील नाही. विजयच्या घरासमोर राहणाऱ्या जेनीला तिचा दारुडा नवरा बेदम मारहाण करत असतो. जेनीला नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायला विजय सांगतो आणि दुसऱ्या भागात पहिल्यांदा त्याची पोलिसांशी गाठ पडते. त्यानंतर जे घडतं ते पाहण्याजोगं आहे.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथाच हिरो असून कथानकाच्या तालावर नाचणाऱ्या कॅरेक्टर्सनी चोख कामगिरी बजावली आहे. पटकथेची मांडणी अत्यंत प्रभावी आहे. चित्रपट अखेरच्या दृश्यापर्यंत खिळवून ठेवतो. ठराविक अंतरानं नवा ट्विस्ट आणतो. संवाद खूप मार्मिक आहेत. त्यामुळं दृश्यांसोबतच संवादांकडेही लक्ष द्यावं लागतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबाला अडचणीत आणू न देण्यासाठी सत्य लपवणारा नायक आणि सत्याचा मागोवा घेताना खलनायक वाटणारे पोलीस ही या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत आहे. मध्यंतरापूर्वीचा भाग पटकथेचा विस्तार करण्यात जातो. त्यात थोड्या संकलनातील त्रुटी जाणवतात. मध्यंतरानंतर मात्र चित्रपट हलण्याचीही संधी देत नाही. अटकेनंतरचा बॅकअप प्लॅन तयार करणारा विजय घरी रेकॅार्डिंग डिव्हाईस लावेपर्यंत गाफील राहतो हे पटत नाही. त्या डिव्हाईसेसचं पुढे काय होतं हेही स्पष्ट होत नाही. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, कला दिग्दर्शन, गीत-संगीत सर्वच बाबतीत चित्रपट उजवा आहे. क्लायमॅक्समधील खटल्याचा भागही थोडक्यात आटोपता घेण्यात आल्यानं फाफटपसारा वाढला नाही. 

अभिनय : अजय देवगणनं साकारलेला नायक विचारपूर्वक आणि सावधगिरीनं पावलं उचलणारा असून, पोलिसांच्या एक पाऊल पुढे आहे. श्रीया सरनच्या वाट्याला आलेली महत्त्वाची दृश्ये तिनं योग्य रीतीनं सादर केली आहेत. खाकीआड दडलेल्या हळव्या आईची भूमिका तबूनं चोख बजावली आहे. अक्षय खन्नामध्ये तो चार्म दिसत नाही. कमलेश सावंतनं पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग केली आहे. नेहा जोशीनंही महत्त्वपूर्ण भूमिका अत्यंत सहजगत्या साकारली आहे.  प्रथमेश परबनंही छोटीशी भूमिका छान साकारली आहे. सौरभ शुक्लांचं छोटंसं कॅरेक्टर अत्यंत महत्त्वाचं असून, ते त्यांनी चांगल्याप्रकारे साकारलं आहे. रजत कपूर, योगेश सोमण, शरद भुताडिया, इशिता दत्ता, मृणाल जाधव या सर्वांनीच उत्तम सहकार्य केलं आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन, पार्श्वसंगीत
नकारात्मक बाजू : संकलन, पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या विचारांचं समर्थन करता येणार नाही.
थोडक्यात : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं कथानक, नाट्यमय वळणं आणि दमदार अभिनयासाठी सत्य-असत्याचा लपंडाव असलेला हा खेळ एकदा तरी पहायलाच हवा.
 

Web Title: Drishyam 2 Movie Review: Ajay Devgan starrer Drishyam 2 movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.