दिग्दर्शक नागेश दरक यांचे निधन
By संजय घावरे | Updated: July 25, 2024 19:34 IST2024-07-25T19:34:46+5:302024-07-25T19:34:57+5:30
Nagesh Darak passed away: दिवंगत दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या टिमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत नावारूपाला आल्यानंतर स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून आपला अमीट ठसा उमटवणारे दिग्दर्शक नागेश दरक (८०) काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

दिग्दर्शक नागेश दरक यांचे निधन
मुंबई - दिवंगत दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या टिमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत नावारूपाला आल्यानंतर स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून आपला अमीट ठसा उमटवणारे दिग्दर्शक नागेश दरक (८०) काळाच्या पडद्याआड गेले आहेत. काल अंधेरी येथील घरी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी सुकन्या, मुलगी वैशाली, माधवी आणि मुलगा सूरज असा परिवार आहे. संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास साकीनाका स्मशानभूमीत नागेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे लातूरचे असलेल्या नागेश दरक यांनी कमलाकर तोरणे यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तोरणे यांच्यासोबत नागेश यांनी 'ज्योतिबाचा नवस' तसेच 'आम्ही जातो आमुच्या गावा' अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी काम केले. त्यानंतर ते हिंदीकडे वळले. मनमोहन देसाईंचे ते अत्यंत आवडते सहाय्यक दिग्दर्शक होते. 'प्रयागराज', 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'मर्द' आदी गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी देसाईंना असिस्ट केले होते. फारुख शेख व राजेश पुरी अभिनीत आणि प्रताप गंगावणे लिखीत 'ऐसे कैसे पती' या हिंदी मालिकेचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. अश्विनी भावे, सतीश पुळेकर, विजय कदम यांच्या प्रमुख भू्मिका असलेल्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या गाजलेल्या चित्रपटाचे नागेश यांनी स्वतंत्रपणे निर्मिती-दिग्दर्शन केले होते. याखेरीज 'कुंकू झालं वैरी', 'मराठा बटालीयन', 'ओटी खणा-नारळाची', वर्षा उसगावकर अभिनीत 'मुंबईचा नवरा' आदी चित्रपटांचे दिग्दर्शनही नागेश यांनी केले.
चित्रभाषेची उत्तम जाण असलेला दिग्दर्शक आणि सिनेमा जगलेला माणूस अशा शब्दांत लेखक प्रताप गंगावणे यांनी नागेश दरक यांच्या विषयीच्या व्यक्त केल्या आहेत. त्यांचे दिग्दर्शन खूप चांगले होते. कागदावरील कथा चित्रपटरूपात यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्याची कला नागेश यांच्या अंगी होती. जिंदादिल व्यक्तिमत्त्व असेही नागेश यांच्याबद्दल गंगावणे म्हणाले.