दिलजीत दोसांझला खलिस्तानीकडून पुन्हा एक धमकी, अमिताभ यांच्या पाया पडणं पडलं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:48 IST2025-11-10T12:36:39+5:302025-11-10T12:48:56+5:30
या धमकीमुळे पंजाब आणि बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली असून दिलजीतच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

दिलजीत दोसांझला खलिस्तानीकडून पुन्हा एक धमकी, अमिताभ यांच्या पाया पडणं पडलं महागात!
गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझला खलिस्तानी समर्थकांकडून विरोध केला जात आहे. दिलजीतच्या ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे झालेल्या त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान काही खालिस्तानी समर्थकांनी गोंधळ घातला होता. 'खालिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी करत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी दिलजीतनं शांतता राखत आपला परफॉर्मन्स सुरू ठेवला होता. आता, खलिस्तानी समर्थकांनी पुन्हा न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये त्याचा आगामी कॉन्सर्ट खराब करण्याची धमकी दिली आहे.
दिलजीत दोसांझच्या आगामी न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरातील कॉन्सर्टला खालिस्तानी गटांकडून धमकी दिली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खालिस्तानी समर्थक संघटनांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, ते दिलजीतचा शो होऊ देणार नाहीत. या घटनेनंतर दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विदेशातील काही खालिस्तानी संघटना भारतीय कलाकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.या संघटनांचा हेतू परदेशात भारताची प्रतिमा डागाळण्याचा आणि तिथल्या भारतीय समुदायात तणाव निर्माण करण्याचा असल्याचं सांगितलं जात आहे.
अमिताभ बच्चन यांचं धमकीशी काय कनेक्शन?
'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) या शोमध्ये सहभागी झाल्यावर त्याने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पाया पडून आदर व्यक्त केला होता. याच कारणामुळे त्याला 'सिख्स फॉर जस्टिस' (SFJ) या खलिस्तानी दहशतवादी संघटनेकडून धमकी मिळाली आहे. एसएफजेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनीही १ नोव्हेंबर रोजी होणारा दिलजीतचा ऑस्ट्रेलियातील कॉन्सर्ट बंद करण्याची धमकी दिली होती. 'सिख्स फॉर जस्टिस' या गटाचा दावा आहे की, दिलजीतने अमिताभ बच्चन यांचे पाय धरून शीख धर्माच्या शिकवणीचा आणि शीख अस्मितेचा अपमान केला आहे. त्यांच्या मते, एखाद्या शीख व्यक्तीने दुसऱ्या कोणासमोर न झुकता फक्त ग्रंथ साहिब (Guru Granth Sahib) समोरच नतमस्तक व्हायला हवे. धमक्या मिळत असूनही दिलजीत दोसांझने आपला आंतरराष्ट्रीय दौरा सुरू ठेवला आहे.