आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 18:00 IST2020-12-27T17:58:10+5:302020-12-27T18:00:28+5:30
मीडिया आता इतका शांत का?असा सवालही मुकेश खन्ना यांनी केला आहे.

आत्महत्या नाही, हत्या आहे म्हणत होते; आता काय झाले? सुशांतप्रकरणी मुकेश खन्ना यांचा सवाल
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून जवळपास चार महिने झाले आहेत. सीबीआयच्या हाती काय लागले, हे त्यांनी सांगावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. आता ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनीही सीबीआयच्या तपासावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही तर मीडिया आता इतका शांत का?असा सवालही त्यांनी केला आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर वृत्त वाहिन्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. सुशांतने आत्महत्या केलेली नाही तर त्याची हत्या झालीये, असा दावा अनेक मीडिया चॅनल्सनी केला होता. सध्या या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. मात्र सीबीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचले नाही. दुसरीकडे मीडियाही शांत पडला. या पार्श्वभूमीवर मुकेश खन्ना यांनी ‘भीष्म इंटरनॅशनल’ या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
काय म्हणाले मुकेश खन्ना
काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देश एकजूट होऊन सुशांतला कोणी मारले? ही आत्महत्या नाही तर हत्या आहे, पोलिस तपास नको तर सीबीआय तपास हवा, असे म्हणत होता. मीडियानेही जोरदार मोहिम सुरु केली होती. पण आज इतके महिने झालेत, यावर कोणी बोलायला तयार नाही. ड्रग्ज प्रकरण आले आणि एसएसआर केस मागे पडली. सीबीआय अनेक महिन्यांपासून तपास करतेय, पण अद्याप कोणताही निष्कर्ष आला नाही. सध्या चॅनल्सवर वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा सुरु आहे. पण सुशांत प्रकरण कुठेही नाही. त्याचा आत्मा वर बसून हे पाहत असेल, असे मुकेश खन्ना यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.
सुशांतचा मृतदेह 14 जून 2020 रोजी त्याच्या राहत्याघरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली होती. सुशांतचा मृत्यूमागे संशय देखील व्यक्त करण्यात आला आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.