लोकमतच्या व्यासपीठावर धडाकेबाज टीम ‘ढिशूम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 19:18 IST2016-06-25T13:48:24+5:302016-06-25T19:18:24+5:30

युवकांनी गच्च भरलेले सेंटर पॉर्इंट हॉटेलचे सभागृह... ढिशूमचे कलावंत जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस यांची धडाक्यात ‘एन्ट्री’...आणि एकच ...

'Dhashoom' campaign on Lokmat's platform | लोकमतच्या व्यासपीठावर धडाकेबाज टीम ‘ढिशूम’

लोकमतच्या व्यासपीठावर धडाकेबाज टीम ‘ढिशूम’

ong>युवकांनी गच्च भरलेले सेंटर पॉर्इंट हॉटेलचे सभागृह... ढिशूमचे कलावंत जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस यांची धडाक्यात ‘एन्ट्री’...आणि एकच जल्लोष... नंतर हे तिघेही कलावंत युवकांच्या विश्वात रमले. तरुण -तरुणींच्या भावविश्वावर स्वार झाले. अगदी वेड लावणारे त्यांचे अस्तित्व चाहत्यांनी अनुभवले. लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या उपस्थितीत लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी या तिघांची घेतलेली खुमासदार मुलाखत अविस्मरणीय ठरली. मस्ती, उत्तेजना, कानठळ्या बसवणारा जल्लोष, क्वचितप्रसंगी किंचाळ्याही, अशा भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या या मुलाखतीत तिघांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू झळाळले. हा कार्यक्रम लोकमत नॉलेज फोरमच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.  ‘सौ तरह के रोग लेलू...’ या गाण्यावर  ढिशूमचे कलावंत जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस यांचा प्रवेश झाला. त्यांचे स्वागत केल्यानंतर ऋषी दर्डा यांनी आपल्या विशिष्ट शैलीत त्यांची मुलाखत घेतली. 

प्रश्न : नागपूर कसे वाटले?
जॉन अब्राहम: ‘नागपुर मेरे लिए हमेशा से फँटास्टिक रहा है’. येथील लोकांचा ‘रिस्पाँस’ जबरदस्त असतो. वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस पहिल्यांदा आले आहे. त्यांनी येथे वडा पाववर ताव मारला. जॅकलीन म्हणाली, वडा पाव तिखट होता. पण तरी तो खाल्ला. 
वरुण धवन : नागपूरला ‘ग्रीनेस्ट सिटी’चा दर्जा प्राप्त आहे. ही अभिमानाची बाब आहे. म्हणूनच हिरव्या रंगाचा पोषाख घातला आहे. येथील खाद्यपदार्थांचे विशेष आकर्षण आहे. 

प्रश्न : ढिशूम चित्रपटाच्या संदर्भात सांगा?
वरुण धवन: चित्रपटात मी आणि जॉन पोलीस अधिकाºयांच्या भूमिकेत आहे. जॉनचे नाव कबीर शेरगील तर माझे जुनैद नाव आहे. आम्ही दोघांनी प्रामाणिक पोलिसांची भूमिका साकारली आहे. जॅकलीनचे नाव इशिका आहे. तिची भूमिका ही ‘मिस्टिरियस’ आहे. अ‍ॅक्शन, कॉमेडी, थ्रिल असलेल्या या चित्रपटात भरपूर मसाला आहे. हा चित्रपट पाहताना काही प्रसंग विचार करायला लावणारेही आहेत. 

प्रश्न : क्रिकेट मॅचच्या फिक्सिंगला घेऊन हा चित्रपट आहे का?
वरुण धवन : गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेट मॅच आणि फिक्सिंगचा संबंध दिसून आला. परंतु असे नाही की क्रिकेटर प्रत्येक प्रकरणात दोषी असतात. या चित्रपटात दोन्ही पोलीस अधिकारी दलाल आणि मॅच फिक्सिंगचे प्रकरण सोडविण्यास जीवाची बाजी लावतात. 

प्रश्न : जॉन अब्राहम तुम्ही युवकांना काय सांगाल?
जॉन अब्राहम : युवकांना हे सांगू इच्छितो की, त्यांनी चांगले शिक्षण घ्यावे. अमली पदार्थापासून दूर रहावे आणि २९ जुलै रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्की पाहवा. रोहित धवन दिग्दर्शित असलेला हा माझा दुसरा चित्रपट आहे. या पूर्वी ‘देसी बॉईज्’मध्ये रोहितसोबत काम केले आहे. 



प्रश्न : वरुण आपण बदलापूर, एबीसीडी, दिलवाले चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या, याबाबत काय सांगाल?
वरुण धवन: चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. ढिशूममध्ये पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत आहे. ‘कॉप’साठी फिट नाही, असे जॉन अब्राहम सरांचे म्हणणे आहे. असे म्हणत ते जोरात हसले आणि चित्रपटातील एक संवाद त्यांनी प्रेक्षकांना ऐकवला. 

प्रश्न : जॅकलीन काय आपण उपस्थितांशी संवाद साधू इच्छिता?
 वरुण धवन: (माईक उचलून) जॅकलीन मराठीत बोलू शकते. 
जॅकलीन फर्नांडिस : एकदम झक्कास, कसा काय नागपूर...नागपूर नंबर एक आहे. येथील लोकांचा प्रतिसाद पाहून भारावून गेली आहे. येथील आवडीचे पदार्थ खायला मिळाले. विशेषत: शुगर फ्री काजू गोळा खाल्ला. पोहे खाल्ले. पाणीपुरी खायची इच्छा आहे. 

प्रश्न : चित्रपटात मॅच ‘फिक्सिंग’ आणि ‘किडनॅपिंग’च्या बाबतीत सांगा?
वरुण धवन : क्रिकेटवर आपण सर्वच जण प्रेम करतो. सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या अनेक खेळाडूंचे लाखो फॅन आहेत. परंतु कुणा क्रिकेटरवर फिक्सिंगचा आरोप होतो तेव्हा ‘हर्ट’ होते. भारतात क्रिकेट हा धर्म आहे. मात्र, फिक्सिंग करणाºयांचा कोणताच धर्म राहात नाही. त्यांचा धर्म केवळ पैसा राहतो. फिक्सिंगला प्रोत्साहन देणे म्हणजे भ्रष्टाचाराला वाव देण्यासारखे आहे. 

प्रश्न : ‘रिअल लाईफ’मध्ये काय सुरू आहे
जॉन अब्राहम : नागपुरात येण्यास खूप उत्सुक होतो. खासदार विजय दर्डा यांना मनापासून मानतो.  ‘फँटस्टिक मॅन’ आहेत. येथील लोकांचे प्रेम पाहून उत्साह संचारतो. नागपूर माझ्यासाठी ‘लकी’ आहे.  येथे ज्या-ज्या चित्रपटाचे प्रमोशन केले ते सर्व ‘हिट’ झाले. हा चित्रपटही खूप चालेल, हा विश्वास आहे. 

    यावेळी या तिन्ही कलावंतांचे स्वागत लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह, हॉटेल सेंटर पॉर्इंटचे संचालक अंगद अरोरा, लोकमतच्या उपाध्यक्ष (ब्रँड अँड कम्युनिकेशन) शालिनी गुप्ता व लोकमत ग्रुप इव्हेंट मॅनेजर नितीन नौकरकर यांनी केले. 

Web Title: 'Dhashoom' campaign on Lokmat's platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.