'देवदास'च्या जनकाला आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:37 IST2016-07-12T07:47:56+5:302016-07-12T13:37:16+5:30
संजीव वेलणकर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय उर्फ बिमलदा यांचा आज (१२ जुलै) जन्मदिन. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात बिमल रॉय ...

'देवदास'च्या जनकाला आदरांजली
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय उर्फ बिमलदा यांचा आज (१२ जुलै) जन्मदिन. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात बिमल रॉय हा वेगळाच फिनॉमिनन होऊन गेला. हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक प्रवाह आले. काही व्यावसायिक होते, काही अभिजात तर काही वास्तववादी. यातला काहीसा समाजवादी विचारसरणीचा प्रवाह आणण्याचे श्रेय ज्या काही कलाकारांना जातं त्यांच्यातले एक म्हणजे बिमल रॉय. दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय.

दो बिघा जमींन :- १९५३
या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
देवदास :-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.
मधुमती :-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.
सुजाता :-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.
बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.