27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रिलीज झाला होता ऋषी कपूर यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 13:32 IST2020-04-30T13:31:02+5:302020-04-30T13:32:30+5:30
होय, 27 वर्षांपूर्वी याचदिवशी म्हणजे 30 एप्रिलला ऋषी कपूर यांचा एक सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता.

27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रिलीज झाला होता ऋषी कपूर यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा
हा विचित्र योगायोग म्हणायचा की, नियतीचा खेळ. होय, आज 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले. 27 वर्षांपूर्वी याचदिवशी म्हणजे 30 एप्रिलला त्यांचा एक सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटाचे नाव आहे, दामिनी. 1993 साली आजच्या दिवशी ‘दामिनी’ चित्रपटगृहांत झळकला होता.
राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या अपोझिट मीनाक्षी शेषाद्री झळकली होती. तर सोबत सनी देओल, अमरीश पुरी यांचेही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘दामिनी’ या सिनेमात ऋषी यांनी शेखर गुप्ताची भूमिका साकरली होती़. न्यायासाठी अख्ख्या समाजाविरोधात लढणा-या महिलेची ही कथा व हा सिनेमा बॉलिवूडच्या बेस्ट वूमन सेंट्रिक चित्रपटात गणल्या जातो. ‘दामिनी’त ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्री यांनी भूमिका केल्या. पण या चित्रपटामुळे खरी लोकप्रियता मिळाली ती सनी देओल याला. त्याचा या चित्रपटातील ‘तारीख पे तारीख’ हा डायलॉग तर इतका गाजला की, ‘दामिनी’ हा सनी देओलचाच सिनेमा ठरला.
ऋषी कपूर यांना कदाचित याबद्दलची खंत असावी. कारण एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी याबद्दलची खंत बोलून दाखवली होती.
‘दामिनी’ या चित्रपटात मी सर्वोत्तम काम केले होते. पण लोकांनी माझी प्रशंसा केली नाही. त्यांनी सनी देओलचे कौतुक केले. पण माझी भूमिका सोपी नव्हती. ती भूमिका पडद्यावर साकारणे अतिशय कठीण होते. तू नसतास तर माझ्या चित्रपटाचे काहीही झाले नसते, असे राजकुमार संतोषी मला आजही म्हणतात, असे ऋषी कपूर या चित्रपटाबद्दल म्हणाले होते.