रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- "मला विचित्र वाटतंय, कारण..."
By देवेंद्र जाधव | Updated: July 8, 2025 12:01 IST2025-07-08T12:00:34+5:302025-07-08T12:01:02+5:30
'रामायण' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला. पण या सिनेमाबद्दल रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाल्या

रणबीरच्या 'रामायण' सिनेमावर दीपिका चिखलियांची नाराजी, म्हणाल्या- "मला विचित्र वाटतंय, कारण..."
काहीच दिवसांपूर्वी रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' सिनेमाचा फर्स्ट लूक भेटीला आला. हा लूक समोर येताच सर्वांनी या सिनेमाचं कौतुक केलं. 'रामायणा'वर आधारीत नवीन सिनेमा येत असला तरीही १९८७ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेली ‘रामायण’ ही ऐतिहासिक मालिका सर्वांच्या मनात आहे. या मालिकेत सीतेची भूमिका साकारलेली अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणाल्या अभिनेत्री?
रामायण सिनेमाबद्दल दीपिका यांची नाराजी
'रामायण' सिनेमात अरुण गोविल दशरथाची भूमिका साकारणार आहेत. दीपिका चिखलिया यांनी याचविषयी एका मुलाखतीत सांगितलं, “मी अरुण गोविल यांना नेहमी राम म्हणूनच पाहिलं आहे. त्यांना दशरथाच्या भूमिकेत पाहणं खूप विचित्र वाटतं. ते माझ्यासाठी कायम प्रभू रामच राहतील. अरुण गोविल यांचं व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरचं तेज हे प्रभू रामासारखंच वाटतं. त्यामुळे त्यांना रामाच्या वडिलांच्या रूपात पाहणं मनाला पटत नाही.” अशाप्रकारे दीपिका यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
नव्या 'रामायण' सिनेमात दीपिका यांना डावललं?
दीपिका यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, “या नव्या रामायणासाठी मला कधीही विचारण्यात आलं नाही. माझ्याशी कोणताही संवाद झाला नाही. एकदा मी सीता साकारली आहे, त्यामुळे पुन्हा रामायणात दुसरी भूमिका घेणं माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. जेव्हा एखादी पवित्र कथा पुन्हा सांगायची असते, तेव्हा मूळ कलाकारांविषयी आदर ठेवणं आवश्यक असतं. रामायण ही भावनिक गोष्ट आहे. प्रेक्षक अजूनही आम्हाला त्या भूमिकांमधूनच ओळखतात,” असं त्या म्हणाल्या.
'रामायण' सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार असून, हा भव्य चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर, सईसोबत सिनेमात हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, रावणाच्या भूमिकेत यश तर भरताच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे झळकणार आहे. सर्वांना 'रामायण' सिनेमाची उत्सुकता आहे.