बॉलिवूडचे हाफ इयर; फुल कॉन्ट्रोव्हर्सी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 21:33 IST2017-07-07T15:12:16+5:302017-07-07T21:33:25+5:30
२०१७ हे वर्ष बॉलिवूडसाठी खूपच वादग्रस्त राहत असल्याचे दिसून येत आहे. कारण आताशी अर्ध वर्ष संपले असून, कॉन्ट्रोव्हर्शीने मात्र ...

बॉलिवूडचे हाफ इयर; फुल कॉन्ट्रोव्हर्सी
दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा
अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने हॉलिवूडमध्ये दीपिका पादुकोणच्या अगोदरच पदार्पण केले आहे. प्रियंकानंतर दीपिकालाही ‘ट्रिपल एक्स’ सीरिजचा हॉलिवूडपट मिळाल्याने ती जागतिक स्तरावर झळकू लागली. या चित्रपटानिमित्त ती अनेक टीव्ही शोज्मध्ये गेस्ट कलाकार म्हणून झळकली. मात्र अशातही तिच्या तुलनेत प्रियंकाच अधिक पॉप्युलर असल्याचे समोर आले. जेव्हा दीपिका आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली तेव्हा वेस्टर्न मीडियाने तिला प्रियंका-प्रियंका म्हणून संबोधले. हे ऐकून दीपिकाचा पारावार उरला नव्हता. तिने मीडियाशी न बोलताच तेथून धूम ठोकली होती.
अक्षयकुमार आणि राष्ट्रीय पुरस्कार
अक्षयकुमारला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचे कौतुक करण्याऐवजी आश्चर्यच अधिक व्यक्त केले गेले. ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी अक्षयला तब्बल २५ वर्षांनंतर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र त्याचा हा पुरस्कार मॅनेज असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त केली गेली. या सगळ्या चर्चांना वैतागून अक्षयनेही पुरस्कार देऊ नका अशी भावना व्यक्त केली. या पुरस्काराच्या रेसमध्ये मनोज वाजपेयी आणि आमिर खान यांची नावे आघाडीवर होती. परंतु मध्येच अक्षयचे नाव आल्याने कॉन्ट्रोव्हर्शी निर्माण झाली होती.
‘पद्मावती’च्या सेटवर हल्ला
संजय लीला भंसाळी यांचा आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट रिलीज अगोदरच वादाच्या भोवºयात सापडला आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर काही लोकांनी अचानक हल्ला करून तोडफोड केली होती. याबाबतचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एकजूट झाल्याचे दिसून आले. हे प्रकरण एवढे वाढले होते की, भंसाळीला खुलासा करावा लागला की, खिलजी म्हणजेच रणवीर सिंग आणि पद्मावती म्हणजेच दीपिका यांच्यात कुठल्याच प्रकारचा रोमॅण्टिक सीन नाही.
करिना कपूर आणि मीरा राजपूत
शाहिद कपूर याची पत्नी आणि एक्स गर्लफ्रेंड करिना कपूर-खान यांच्यातही काहीशी कॉन्ट्रोव्हर्शी बघावयास मिळाली. जेव्हा मीरा जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात सहभागी झाली होती तेव्हा तिने म्हटले होते की, मी एक हाउस वाइफ असून, माझ्या मुलीची पूर्ण काळजी घेते. तिला पूर्ण वेळ देते. ती काही पपी (कुत्र्याचे पिल्लू) नाही की मी तिला केवळ तासभरच वेळ देऊ शकेल. मीराच्या या वक्तव्यानंतर चांगलेच वादंग पेटले होते. मात्र याचा संबंध करिनाशी जोडण्यात आला होता. लोकांना करिनाची प्रतिक्रिया ऐकायची होती. अखेर करिनाने प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, मी एक व्यावसायिक महिला असून, मुलाचा सांभाळ करून काम करण्याला प्राधान्य देते.
सोनू निगम
गायक सोनू निगम याने मस्जिदमध्ये होणाºया अजानसंबंधी वादग्रस्त ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. ‘अजानमुळे मी पाहटे झोपू शकत नाही’ असे त्याने ट्विट केले होते. याचे देशभर पडसाद उमटले. पश्चिम बंगालच्या मौलवीने तर सोनू निगमचे जो कोणी मुंडण करेल त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल असा फतवा काढला होता. सोनूने मौलवीचे हे आव्हान स्वीकारत आलिम नावाच्या मित्राकडून मुंडण करून घेतले. हा सर्व ड्रामा माध्यम प्रतिनिधींच्या समोर घडल्याने, देशभर चांगलाच चर्चिला गेला. काही दिवसांनंतर सोनूने त्याचे ट्विटर अकाउंटच डिलीट केले.
पहलाज निहलानी आणि इंटरकोर्स
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना बॉलिवूडचा आणि बॉलिवूडकरांना त्यांचा चांगलाच तिटकारा असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा स्टारर ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या मिनी ट्रेलरमध्ये ‘इंटरकोर्स’ असा शब्द वापरण्यात आला होता. ही बाब सेन्सॉरच्या फारशी पचनी पडली नाही. मग काय, पहलाज यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत ट्रेलरमधून हा शब्द काढला जाणार नाही, तोपर्यंत चित्रपटाला प्रमाणपत्र देणार नाही. सध्या हा वाद चांगलाच गाजत आहे.