क्रिकेटप्रेमी होता 'हा' अभिनेता! भारत-श्रीलंका मॅच पाहतानाच जीव सोडला...; नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:31 IST2025-10-23T12:27:01+5:302025-10-23T12:31:06+5:30
क्रिकेटप्रेमी होता 'हा' अभिनेता! भारत-श्रीलंका मॅच पाहताना हृदयविकाराचा झटका आला अन् होत्याचं नव्हतं झालं

क्रिकेटप्रेमी होता 'हा' अभिनेता! भारत-श्रीलंका मॅच पाहतानाच जीव सोडला...; नेमकं काय झालं?
Shafi Inamdar: हिंदी चित्रपटसृष्टीत केवळ आपल्या संवादफेकीने ओळखले जाणारे मोजके कलाकार आहेत. या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेते शफी इनामदार.आपल्या विशिष्ट संवादफेकीमुळे शफी ओळखले जातात मात्र चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. आपल्या अभिनय कारकिर्दीत शफी यांनी सहाय्यक भूमिका केल्या असल्या, तरी आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रत्येक पात्रात जीव ओतला आहे.शफी इनामदार यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या अभिनय प्रवासाचा पाया रचला.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे २३ ऑक्टोबर १९४५ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षम गावाकडेच झालं तर मुंबईतील के.सी महाविद्यालयात शफी यांनी पुढील शिक्षण पूर्ण केलं.अगदी बालपणापासूनच त्यांना अभिनय क्षेत्रात रुची होती.शिक्षण पूर्ण करत असतानाच त्यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं.
शफी ईनामदार हे नाव मराठीसह गुजराती रंगभूमीवरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. अनेक गाजलेल्या मराठी नाटकांचं गुजरातीमध्ये रुपांतर करत त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. १९८२ मध्ये त्यांनी शशी कपूर यांच्या विजेता चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.या चित्रपटानंतर अर्धसत्य मध्ये त्यांनी हैदर अली साकारुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. हा सिनेमा त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. याशिवाय दुरदर्शनवरील ये है जो जिंदगी या मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तसेच नजराना, अनोखा रिश्ता, अमृत, सदा सुहागन हे त्यांचे चित्रपटही चांगले गाजले.
क्रिकेट मॅच बघताना हृदयविकाराचा झटका आला अन्...
शफी इनामदार यांनी अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, या अभिनेत्याने अगदी कमी वयातच जगाचा निरोप घेतला.शफी ईनामदार हे क्रिकेटप्रेमी होते. १३ मार्च १९९६ चा भारत विरुद्ध श्रीलंका वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. हा सामना बघताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं जागच्या जागी निधन झालं.