बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं फाइव्ह स्टार हॉटेलच्या टॉयलेटमध्ये उजळलं नशीब, तिथेच मिळाला होता पहिला सिनेमा, वाचा हा मजेशीर किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:47 IST2025-09-26T12:43:33+5:302025-09-26T12:47:28+5:30
बॉलिवूडमध्ये कोणाचं नशीब कधी बदलेल, हे सांगता येत नाही. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या बाबतीतही अशीच एक घटना घडली.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचं फाइव्ह स्टार हॉटेलच्या टॉयलेटमध्ये उजळलं नशीब, तिथेच मिळाला होता पहिला सिनेमा, वाचा हा मजेशीर किस्सा
बॉलिवूडमध्ये कोणाचं नशीब कधी बदलेल, हे सांगता येत नाही. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे(Chunkey Pandey)च्या बाबतीतही अशीच एक घटना घडली. आज 'आखरी पास्ता' म्हणून त्याची नवी ओळख असली, तरी एक काळ असा होता की त्याच्याकडे काम नव्हते. मात्र, त्याने पहिली फिल्म मिळाली तो क्षण अविस्मरणीय ठरला. चंकी पांडेने एका मुलाखतीत त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या एंट्रीमागील गमतीशीर किस्सा सांगितला होता.
चंकी पांडे एकदा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाच्या पार्टीला गेला होता. त्याने चुडीदार पायजमा घातला होता, ज्याचा नाडा बांधला तर गेला, पण त्याला तो उघडता येत नव्हता. अभिनेत्याने सांगितले की, "माझी एक समस्या आहे, मी नाडा बांधू शकतो पण उघडू शकत नाही. मी थोडी जास्त बीअर प्यायलो होतो. मी रिलॅक्स होण्यासाठी वॉशरूममध्ये गेलो, पण नाडा काही केल्या उघडत नव्हता. मी ओरडलो, 'कोणीतरी मला मदत करा!' लोकांना वाटलं की मी गंमत करत आहे."
वॉशरूममध्ये बेशुद्ध झाला चंकी पांडे
यावेळी त्याच्या मदतीला धावून आले ते दुसरे-तिसरे कोणी नाही, तर त्यावेळचे मोठे निर्माते पहलाज निहलानी. चंकी पांडे पुढे म्हणाला की, "तुम्ही विश्वास ठेवू शकता? आम्ही बोलत होतो आणि तेव्हा इंटरनेट वगैरे नव्हतं. त्यांनी मला विचारलं, 'तुम्ही काय करता?' मी म्हणालो, 'मी मॉडेल आहे आणि चित्रपटांमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सर, तुम्ही काय करता?' ते म्हणाले, 'मी नुकतीच गोविंदासोबत 'इल्जाम' सिनेमा बनवला आहे.' (हे ऐकून) मी तर जवळपास बेशुद्ध झालो होतो! मी म्हणालो, 'तुम्ही पहलाज निहलानी आहात! तुम्हाला भेटून आनंद झाला.' हात न धुताच मी त्यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत होतो."
यानंतर चंकी पांडे आणि पहलाज निहलानी यांची पुन्हा एका पार्टीत भेट झाली, जिथे ते दोघेही याच किस्स्यावर हसले. या भेटीनंतर पहलाज निहलानी यांनी चंकी पांडेला त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या 'आग ही आग' या चित्रपटासाठी कास्ट केले.