बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:27 IST2025-11-13T11:26:29+5:302025-11-13T11:27:31+5:30
Mukesh Bhatt : चित्रपट निर्माता मुकेश भट यांनी त्यांचे बंधू महेश भट यांच्यासोबत मिळून अनेक चित्रपट बनवले. त्यांनी नुकतीच त्यांच्या कुटुंबातील संबंधांबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला.

बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
भट बंधूंनी एकत्र येऊन 'आशिकी', 'सडक', 'मर्डर' आणि 'राज' यांसारखे बॉलिवूडमधील काही मोठे हिट चित्रपट दिले. मात्र, २०२१ मध्ये एका वादामुळे ते व्यावसायिकरित्या वेगळे झाले. तेव्हापासून मुकेश भट यांनी लोकांशी फारसा संपर्क ठेवला नाही, पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की या दुराव्याचा त्यांच्यावर भावनिकरित्या कसा परिणाम झाला.
लहरें रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत मुकेश भट यांनी खुलासा केला की, त्यांना त्यांची भाची आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले नव्हते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, "जर मी म्हटलं की मला वाईट वाटले नाही, तर तो माझा ढोंगीपणा असेल. नक्कीच, मला वाईट वाटले. माझे आलियावर खूप प्रेम आहे, फक्त तिच्यावरच नाही तर शाहीनवरही. त्यामुळे जेव्हा तिचे लग्न झाले, तेव्हा मला वाटले की माझ्या मुलीचे लग्न आहे. मी तिथे जायलाच हवे होते."
"'राहा'ला अजूनही भेटलो नाही"
मुकेश भट यांनी हे देखील सांगितले की, ते अद्याप आलिया आणि रणबीरची मुलगी 'राहा'ला भेटलेले नाहीत. राहा यावर्षी तीन वर्षांची होईल. ते म्हणाले, "जेव्हा मला कळले की आलिया गर्भवती आहे आणि नंतर तिला बाळ झाले, तेव्हा माझे डोळे 'राहा'ला पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. मला लहान मुले खूप आवडतात." आलियाला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला का, असे विचारले असता, मुकेश यांनी सांगितले की त्यांनी आलियाला अनकंफर्टेबल वाटू नये म्हणून तसे करणे टाळले. त्यांनी शेवटी सांगितले, "मी प्रयत्नही केला नाही कारण मला त्यांना अनकंफर्टेबल परिस्थितीत टाकायचे नव्हते. मी त्यांना मेसेज तर केला नाही, पण मी मनाने आशीर्वाद दिले."
विक्रम भटचा खुलासा
विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले विक्रम भटने महेश भट्ट आणि त्यांचे बंधू मुकेश यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबद्दल सांगितले. एका जुन्या संभाषणाची आठवण करून देत त्यांनी सिद्धार्थ कन्नन यांना सांगितले होते, "भट साहेब (महेश भट्ट) मला म्हणाले, 'तू कंपनीतून बाहेर पड.' मी त्यांना विचारले काय झाले, तेव्हा ते म्हणाले, 'माझ्या भावाने (मुकेश भट) अनेक वर्षे माझे शोषण केले आहे. तो तुझे शोषण करू नये अशी माझी इच्छा आहे. तू जा आणि स्वतः काहीतरी कर.' बॉसने (मुकेश) जे सांगितले ते मला करावे लागले."